“एसएसपीएमएस’ मैदानावर प्रशासनाचे नियोजन
पुणे – खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेले बेड आणि सीओईपीच्या ग्राऊंडवर जम्बो हॉस्पिटलचे काम पूर्ण झाल्यावर सुमारे आठ दिवसांत 800 बेड्स उपलब्ध होणार आहे. तसेच मागील काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर “एसएसपीएमएस’च्या मैदानावर तिसरे जम्बो हॉस्पिटल उभारायचे की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय शुक्रवारी (दि.14) होणार आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासन, महापालिका यांची उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यामध्ये याविषयी चर्चा होणार आहे. करोना बाधितांना बेड्स मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्याने करोनाची लक्षणे नसलेल्या तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनचा पर्याय देण्यात आला आहे. यासाठी समुपदेशनही करण्यात येते. यामुळे गरजूंना बेड उपलब्ध होईल, असा या मागचा हेतू आहे.
ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सोय असलेल्या बेड्सची मागणी वाढली आहे. त्यावर प्रशासनाने सीओईपी कॉलेजच्या ग्राऊंडवर जम्बो हॉस्पिटलचा निर्णय घेतला. त्याचे काम गतीने सुरू आहे. जर बाधितांची संख्या नियंत्रणात असेल आणि खासगी रुग्णालयांतील बेड्ची संख्या वाढली असेल, तर तिसरे जम्बो हॉस्पिटल उभारायण्याची आवश्यकता आहे का, यावर शुक्रवारी निर्णय होईल.
एका जम्बो हॉस्पिटलसाठी सहा महिन्यांसाठी सुमारे 90 कोटी रुपयांचा खर्च येतो. यातील 50 टक्के- राज्य शासन, 25 टक्के- पुणे, 15 टक्के-पिंपरी-चिंचवड महापालिका आणि उर्वरित 10 टक्के रक्कम जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारली जाणार आहे. जर आवश्यकता भासली, तर पीएमआरडीए काही निधी देणार आहे.
– सौरभ राव, विभागीय आयुक्त