मुंबई – महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे (सीएसके) नेतृत्व यंदाची आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी काही तास आधीच सोडल्याचे जाहिर करत सर्वांनाच धक्का दिला होता. मात्र, संघाचे नेतृत्व सोडण्याचा विचार त्याने गेल्या मोसमापासूनच बोलून दाखवला होता. मात्र, हा निर्णय आम्ही त्याच्यावरच सोडला होता, असा खुलासा सीएसकेचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी केला आहे.
गेल्या वर्षीच्या आयपीएल स्पर्धेनंतरच तो कर्णधारपद सोडण्याच्या वितारात होता. मात्र, हे कधी जाहिर करायचे व निर्णय बदलायचा की नाही ते ठरवण्याचा हक्क धोनीलाच होता. गेल्या मोसमातच याबाबत धोनीशी माझी चर्चा झाली होती. यंदा हा निर्णय प्रत्यक्ष जाहिर केला गेला असला तरीही धोनीच्या मनात हे फार पूर्वीपासूनच होते. त्याला नवा कर्णधार नियुक्त करण्याची इच्छा होती व त्यासाठीच तो अनेक खेळाडूंशी वारंवार चर्चाही करत होता, असा खुलासाही फ्लेमिंग यांनी केला.
धोनीने या स्पर्धेच्या 15 मोसमांपैकी तब्बल 12 मोसमात संघाचे नेतृत्व केले. या कालवधीत त्याने संघाला चार वेळा विजेतेपद मिळवून दिले, तर पाच वेळा उपविजेतेपद मिळाले. त्याने यंदाची स्पर्धा सुरु होण्यापूर्वी कर्णधारपद सोडले व ही जबाबदारी रविंद्र जडेजाकडे सोपवली. धोनी 2008 सालापासून सीएसकेचा प्रमुख खेळाडू आहे. मध्यंतरी 2016 व 2017 साली सीएसके संघावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर ही बंदी मागे घेतली गेली व धोनीने पुन्हा एकदा सीएसकेचे नेतृत्व आपल्या हाती घेतले होते.