अहमदाबाद – भाजपशासित गुजरातमध्ये करोनामृतांचा आकडा अत्यल्प दाखवण्यात आल्याचा सनसनाटी आरोप कॉंग्रेसने सोमवारी केला. गुजरातमध्ये 10 हजार 81 करोनाबाधित दगावल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. प्रत्यक्षात, 2.81 लाख बाधित मृत्युमुखी पडले, असा दावा कॉंग्रेसकडून करण्यात आला.
माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते भरतसिंह सोलंकी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना करोनामृतांचा खरा आकडा लपवला जात असल्याचा आरोप केला. कॉंग्रेसने 16 ऑगस्टपासून गुजरातमध्ये न्याय यात्रा सुरू केली आहे.
यात्रेदरम्यान महिनाभरात कॉंग्रेस नेत्यांची करोना संसर्गामुळे घरातील सदस्य गमावलेल्या 31 हजारहून अधिक कुटूंबांची भेट झाली. तो आकडाच सरकारी आकड्यापेक्षा तिप्पट आहे, असे ते म्हणाले. करोना संकटावेळी ऑक्सिजन, रूग्णालयातील बेडस्, रूग्णवाहिका यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवला.
औषधांचा काळाबाजार झाला. राज्य सरकारच्या अपयशामुळे जनतेला प्रचंड यातना भोगाव्या लागल्या. गुजरातमध्ये भाजपने नुकतेच मुख्यमंत्री बदलले. संतप्त जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी नेतृत्वबदलाचे पाऊल उचलणे भाजपला भाग पडले, असे टीकास्त्रही सोलंकी यांनी सोडले.