न्यूयॉर्क : जगात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात ३६ लाख ४७ हजार ६२३ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी दोन लाख ५२ हजार ४४४ जणांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत ११ लाख ९३ हजार जणांनी करोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत ७८ हजार ३७७ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. तर तीन हजार ८७७ जणांचा मृत्यू झाला.
जगभरात करोनाचा फटका सर्वाधिक अमेरिकेला बसला आ०हे. आतापर्यंत जगातील रूग्णांपैकी एक तृतियांश रुग्ण अमेरिकेतील आहेत. तर जगातील एकूण मृत्यूपैकी एक चतुर्थांश मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत १२ लाख १२ हजार ९५५ जणांना संसर्ग झाला आहे तर ६९ हजार ९२५ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. स्पेनमध्ये २५ हजार ४२८ जणांचा मृत्यू झाला तर दोन लाख ४८ हजार ३०१ जणांना संसर्ग झाला आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत जवळपास ३० हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
सिंगापूरमध्ये वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांपैकी ४८०० भारतीयांना करोनाचा संसर्ग झाला असून त्यांची लक्षणे मात्र सौम्य आहेत असे तेथील भारतीय उच्चायुक्तांनी म्हटले आहे. सिंगापूरचे आरोग्य मंत्री गॅम किम योंग यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात ५७३ नवीन रुग्ण सापडले आहेत. एप्रिल अखेर सिंगापूरमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले असून त्यात भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. सिंगापूरमध्ये एकूण करोना रुग्णांची संख्या १८७७८ आहे.