ढाका – बांगलादेशामध्ये आता बलात्काराच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. या संदर्भातील कायद्यातील तरतुदीमध्ये बदल करण्याच्या अध्यादेशावर बांगलादेशचे अध्यक्ष अब्दुल हमिद यांनी मंगळवारी स्वाक्षरी केली.
त्यामुळे या कायद्याची त्वरित अंमलबजावणीही केली जाऊ शकणार आहे. यापूर्वी बलात्काराच्या गुन्ह्यासाठी आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद बांगलादेशमध्ये होती. मात्र अलीकडच्या काळामध्ये बांगलादेशात झालेल्या बलात्काराच्या अनेक घटनांनंतर शिक्षेचे स्वरूप अधिक कठोर करण्याची मागणी व्हायला लागली होती.
बांगलादेशातील केंद्रीय मंत्रिमंडळाने यासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा, अशी सूचना अध्यक्षांनीच केली होती. त्यानंतर मंत्रिमंडळाने महिला आणि बालके शोषण प्रतिबंध कायद्यात अध्यादेश काढला आहे, असे बांगलादेशच्या अध्यक्ष्यांच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेला सांगितले.
बांगलादेशात काही दिवसांपूर्वी सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच्या निषेधार्थ मोठा जनक्षोभ उसळला होता. आंदोलनादरम्यान बलात्काराच्या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली होती. व्हिडिओ प्रकरणातील 8 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.