चंद्रपूर – चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सर्वात वयोवृद्ध वाघाचा मृत्यू झाला आहे. या वाघाचे वय 17 वर्षे होते. इतक्या वयाचा हा राज्यातील एकमेव वाघ होता. वाघडोह नावाने प्रसिद्ध असलेला हा वाघ प्रचंड धिप्पाड होता. चंद्रपूरमधील सीनाळा जंगलात वास्तव्य असलेल्या या वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला.
दोन दिवसांपूर्वी वाघाडोह वाघाच्या हल्ल्यात सिनाला येथे गुराख्याचा मृत्यु झाला होता. तेव्हापासून वाघाडोह वाघावर ताडोबाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष होते. त्याची प्रकृती ठीक नव्हती. 17 वर्षे वय असल्याने तो म्हातारा झाला होता. अशातच आज सोमवारी सकाळी त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. सर्वसाधारणपणे 12 ते 15 वर्षे वयादरम्यान वाघाचा नैसर्गिक मृत्यू होतो. मात्र, या वाघाने ती मर्यादा ओलांडली होती.
वृद्ध झाल्याने या वाघाला शिकार करताना मर्यादा येत होत्या. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात या वाघाने आपला सुरूवातीचा काळ घालवला. मात्र, वृद्ध झाल्याने येथील तरूण वाघांनी त्याला हुसकावून लावले. त्यानंतर त्याचे वास्तव्य ताडोबाच्या बफर क्षेत्रालगत असलेल्या जंगलात होते. सहज शिकार मिळावी म्हणून हा वाघ येथे गावाशेजारी राहून होता.
वाघडोह वाघ “बिग डॅडी ऑफ ताडोबा’ म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा होत्या. हा वाघ एकेकाळी ताडोबाची शान होता. त्याच्यापासून 40 बछड्यांचा जन्म झाल्याचा अंदाज आहे.