fbpx

मालकिणीला वाचविण्यासाठी श्‍वानाची प्राणाची आहुती

प्रा. डी. के. वैद्य
अकोले  – पट्टेरी वाघ सदृश प्राण्याच्या हल्ल्यातून मालकिणीचा जीव वाचवण्यासाठी ल्युसी या कुत्रीने थेट त्याच्यावरच हल्ला चढवला. या हल्ल्यात मालकिण वाचली. मात्र ल्युसीने आपल्या प्राणाची आहुती दिली. या घटनेमुळे संबंधित घरात तीन दिवस चूलही पेटली नाही. या कुटुंबाने सन्मानपूर्वीक ल्युसीचा दफन विधी केला.

मनाला चटका लावणारी ही घटना तालुक्‍यातील मेहेंदुरी येथे दोन दिवसांपूर्वी घडली. घटना म्हटली तर साधी. पण माणूस आणि कुत्रा यांच्या अन्योन्य संबंध हा कायम राहिलेला आहे. इमान व विश्वास या दोन संज्ञा लागू पडणारे जनावर व पशु म्हणजे श्वान होय. शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते रंगनाथ मालुंजकर यांची वस्ती ही मेहेंदुरी-म्हाळादेवी रस्त्यावर आहे. तेथे त्यांचे चिरंजीव सुनील आपली आई, पत्नी व मुलासह राहतात.

या परिसरामध्ये ऊस शेती आहे. नदीच्या काठावर असणाऱ्या त्यांच्या घराशेजारी बागायती क्षेत्र आहे. सोमवारी (दि.6) सायंकाळच्या झुंजूमुंजू वातावरणात पट्टेरी वाघ सदृश प्राण्याची भीती ध्यानात घेऊन अर्चना सुनील मालुंजकर या आपल्या पाळीव ल्युसी नावाच्या कुत्रीला गोठ्यामध्ये बंदिस्त छपरात बांधण्यासाठी जात होत्या.ल्युसी ही लॅब ब्रीडची आहे. पोलिसांच्या श्वान पथकात या ब्रीडचा अंतर्भाव असतो.

याच वेळी या पट्टेरी वाघ सदृश प्राणी आपल्या मालकीणीवर झेप घेण्याच्या पवित्र्यात असल्याचे ल्युसीने हेरले. तिने या या प्राण्यावर जोरदार झेप घेतली. या प्राण्याने चवताळून ल्युसीला अलगद जबड्यात पकडले आणि शेजारच्या उसात गायब झाला.

हा प्रकार एवढा अनपेक्षित होता की, अर्चना मालुंजकर यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. त्यात मदतीची अपेक्षाही करता येत नव्हती. कारण आजूबाजूला कोणीही उपलब्ध नव्हते. मागील दोन वर्षे कुटुंबातील व्यक्तींना लळा लावणारी ल्युसी ही जंगली श्‍वापदाच्या भक्षस्थानी पडण्याचे आपल्या डोळ्याने पाहणे नशिबी आले.दुसऱ्या दिवशी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व अर्चना यांचे पती सुनील यांनी चार जणांना सोबत घेऊन सर्व शेतातील परिसर शोधला. उसामध्ये ल्युसीचा मृतदेह त्यांना सापडला.

अशा अवस्थेत तिला त्यांनी घरी आणले. मंगळवारी सायंकाळी तिचा मोठ्या जड अंतकरणाने दफनविधी पार पाडला. मागील दोन-तीन दिवसांपासून घरामध्ये चूल पेटलेली नाही. घरातील सर्वच हवालदिल झालेले आहेत. या घटनेच्या अनुषंगाने या परिसरात वनखात्याने पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे.

ठसे तपासून शोध घेण्याची गरज
या भागात पट्टेरी वाघ सदृश प्राणी असल्याचा दावा या घटनेने बाधित झालेले सुनील मालुंजकर यांनी केला. बट्टेरी वाघ आम्ही स्वतः पाहिला असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. वाघ या भागात तरी आहे काय? हा प्रश्न असला, तरी वनखात्याने मात्र या दृष्टीने शोध घेऊन किंवा ठसे तपासून तपास करण्याची आणि या भागातील जनतेला भयमुक्त करण्याची गरज आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.