बुरहान वानीचा साथीदार लतिफ टायगरचा खात्मा

जम्मू-काश्‍मीरमधील चकमकीत तीन दहशतवादी ठार

श्रीनगर: जम्मू-काश्‍मीरमध्ये शुक्रवारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये खतरनाक दहशतवादी लतिफ दार उर्फ लतिफ टायगर याचाही समावेश आहे. तो तीन वर्षांपूर्वी मारला गेलेला हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्‍या बुरहान वानी याचा साथीदार होता.

दक्षिण काश्‍मीरच्या शोपियॉं जिल्ह्यात काही दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे त्यांनी शोध मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेवेळी दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये लतिफ टायगरसह तीन दहशतवादी मारले गेले. लतिफ टायगर 2014 मध्ये दहशतवादाच्या मार्गावर गेला. त्यानंतर दक्षिण काश्‍मीरमधील काही सरपंचांच्या हत्येसह विविध दहशतवादी कारवायांत तो सामील होता. त्याच्या खात्म्यानंतर दक्षिण काश्‍मीरमध्ये केवळ रियाझ नायकू आणि झाकीर मुसा हे दोनच जुने आणि खतरनाक दहशतवादी उरल्याचा अंदाज आहे.

बुरहान ठार झाल्यानंतर नायकूचा साथीदार म्हणून लतिफ टायगर सक्रिय होता. त्याचा खात्मा हे पोलिसांचे मोठेच यश मानले जात आहे. दरम्यान, सुरक्षा दलांच्या कारवाईत अडथळा आणण्याच्या उद्देशाने स्थानिकांच्या जमावाने त्यांच्यावर दगडफेक केली. त्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना बळाचा वापर करावा लागला. त्यात दोघे जखमी झाल्याचे समजते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.