थेरगाव हल्ल्यातील तरुणाचा मृत्यू

आरोपी-फिर्यादीचा वाद
पूर्ववैमनस्यातून खून केल्याची तक्रार : चार जणांना अटक

पिंपरी – थेरगाव येथे मित्राच्या आईसोबत गाडीवरून जाणाऱ्या तरूणांवर सहा जणांनी वार करुन त्याला जखमी केले होते. तरूणाच्या तोंडावर, डोक्‍यात, पाठीवर, हातावर, पायावर वार झाल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे वाकड पोलिसांनी सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे.

हा हल्ला सोमवारी (दि.15) रात्री सव्वा बाराच्या सुमारास थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराजवळ झाला होता. बाबासाहेब महादेव वडमारे (वय 34, रा. कैलासनगर, थेरगाव) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. अनिकेत रुपसिंग भाट (वय 21), राहुस उर्फ सुधीर सहदेव झेंडे (वय22) मेहबूब दस्तगीर पटेल (वय 22) युवराज अशोक शिंदे (सर्व रा. थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर स्वप्नील सगर व रुतिक उर्फ रुषभ रमेश मिश्रा ( दोघे रा. थेरगाव) फरार आहेत. याप्रकरणी विशाखा महादेव वडमारे (वय 28) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बाबासाहेब सोमवारी (दि.15) रात्री सव्वा बाराच्या सुमारास मित्राची आई अनिता भाट(वय 45) यांना दुचाकीवर घेऊन येत होता. दरम्यान, थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराजवळ सहा जणांनी त्याच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. यामध्ये बाबासाहेब आणि अनिता दोघेही गंभीर जखमी झाले. बाबासाहेब काही वेळासाठी शुद्धीवर आला. त्यावेळी त्याने बहीण विशाखा हिला आपल्यावर हल्ला झाला असल्याचे सांगितले. मात्र विशाखाला माहिती देत असतानाच बाबासाहेब पुन्हा बेशुद्ध झाले. त्यानंतर विशाखाला अनिता यांच्यावरही हल्ला झाल्याचे समजले, तिने याबाबत माहिती घेऊन वाकड पोलिसांशी संपर्क साधला.

वाकड पोलिसांनी तपास करत या प्रकरणातील चार जणांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता, आरोपी अनिकेत भाट आणि फिर्यादी विशाखा यांचे मागील सहा महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. त्या रागातून अनिकेत याच्या सांगण्यावरून त्याच्यासह पाच जणांनी मिळून विशाखा यांचा भाऊ बाबासाहेब यांच्यावर सशस्त्र हल्ला केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)