खड्डयात पडून लोणी येथील युवकाचा मृत्यू

मंचर – लोणी (ता. आंबेगाव) येथे लोणी-पाबळ रस्त्यावर आदक वस्तीजवळ रस्त्याचे काम चालू असलेल्या दहा फूट खड्ड्यात पडून युवकाचा मृत्यू झाला आहे.

विशाल खंडू सिनलकर (वय 32, रा. लोणी, ता. आंबेगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत शंकर सिनलकर यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणी येथे पाबळकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम चालू आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोऱ्या बांधण्यासाठी खड्डे खोदण्यात आले असून त्या खड्ड्याभोवती सुरक्षेचे तुटपुंजे उपाय केले आहेत.

रस्ता दिशादर्शक फलक लावलेला नसल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांची फसगत होते. यामुळे विशाल दहा फूट खड्ड्यात स्वतःच्या दुचाकीसह (एमएच 12 एमजी 4915) पडला. डोक्‍याला मार लागून त्यचा मृत्यू झाला आहे. विशाल हा कनेरसर (ता. खेड) येथील कंपनीत नोकरीला होता.

तो दररोजप्रमाणे कामावरून रात्री येत असताना दुचाकीवरून या खड्ड्यात पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. रस्त्याच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे विशालचा मृत्यू झाला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या ठेकेदाराने अजूनही रस्त्याबाबत वाहनचालकांसाठी दिशादर्शक फलक लावण्याची काळजी घेतली नाही, तर अनेक जणांचे अपघात होण्याची शक्‍यता आहे. येथूनच काही मीटर अंतरावर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन झालेली पोलीस चौकी सहा महिन्यापासून बंद अवस्थेत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.