अकोले -बोहल्यावर जाण्यास आतुर असलेल्या व लग्नाच्या तिथीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेल्या ऊसतोड कामगार युवकाचा बुडून मृत्यू झाला. अकोले पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
कळस येथील प्रवरा नदी पात्रात ही घटना 25 तारखेला घडली. अगस्ती साखर कारखान्याचा ऊसतोडणी कामगार कृष्णा वाळु मेंगाळ (वय 21, पेडकवाडी ता कन्नड़ जि औरंगाबाद) याचा बुडून मृत्यू झाला. आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान नदीपात्रात त्याचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. 25 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान तो बैल धुण्यासाठी प्रवरानदी काठी गेलेला असताना त्याचा पाय घसरल्याने तो पडला.
दोन दिवस शोध कार्य करूनही तो सापडला नाही. कळस येथील नामदेव निसळ, भाऊसाहेब गोपीनाथ वाकचौरे, गोरख वाकचौरे यांनी शोध घेतला. अगस्ती कारखान्याची ऊसतोडणी बंद झाल्यानंतर तो बैल धुवून घरी जाण्यासाठी निघालेला असताना त्याच्यावर काळाने घाला घातला आहे. विशेष म्हणजे आज त्याच्या लग्नाचा बस्ता बांधावयाचा होता, असेही समजते. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.