नगर – नगर-वांबोरी रस्त्यावरील डोंगरगण येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकीस जोराची धडक दिल्याने नालेगाव येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवार (दि. 17) रोजी साडे अकराच्या सुमारास घडली.
सागर बाळासाहेब देवतरसे (वय-30,रा. वारूळाचा मारूती जवळ नालेगाव, नगर) असे मयत तरूणांचे नाव आहे. सागर देवतरसे हा नगरहून वांबोरीकडे दुचाकीवरून (क्र.एम.एच.16. बीए. 7941) चालला होता. तर वांबोरीहून नगरकडे अवैध वाळू वाहतूक करणारा विना क्रमांकाचा डंपरने डोंगरगण शिवारात दुचाकीस्वारास जोराची धडक दिली. यामध्ये देवतरसे या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी डोंगरगण, मांजरसुंबा तसेच पिंपळगाव माळवी येथील ग्रामस्थांनी डोंगरगण रस्त्यावर विविध ठिकाणी गतीरोधक बसवावे तसेच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात संबंधित विभागने कडक कारवाई करावी अशी मागणी करत धरणे आंदोलन केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.