आरक्षणाची तारीख ठरली अन्‌ गाव पुढारी सरसावले

शिरूर तालुक्‍यातील 93 सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीची तारीख ठरली

विशाल वर्पे
केंदूर (पुणे) – करोना प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील 1 हजार 400 ग्रामपंचायतीच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यामध्ये 27 मार्च रोजी सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर होणार होते, मात्र लॉकडाउनमुळे आरक्षण सोडतदेखील लांबणीवर पडली होती. नुकताच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी येत्या 8 डिसेंबर रोजी सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्थरावर राजकारणात सक्रिय असणाऱ्यांच्या आणि गाव पुढाऱ्यांच्या नजरा आता सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत.

जानेवारीमध्ये ग्रामपंचायत निवडणुका होऊ शकतात, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. तर पुणे जिल्ह्यातील 749 ग्रामपंचायत मतदार याद्यांचा कार्यक्रमदेखील जाहीर झाला आहे. जिल्ह्यामध्ये 1408 ग्रामपंचायतच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे मात्र नव्याने 8 ग्रामपंचायती स्थापन झाल्या आहेत. त्यामध्ये शिरूर तालुक्‍यात तीन, आंबेगाव, जुन्नर, भोर, इंदापूर, हवेली तालुक्‍यातील प्रत्येकी एक अशा 8 नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण सोडती बाबत अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

शिरूर तालुक्‍यातील एकूण 93 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत होणार आहे. त्यापैकी सर्वसाधारण जागेसाठी 57 जागा आरक्षित आहेत. यामध्ये 29 महिलांनादेखील आरक्षित जागा ठेवण्यात आल्या आहेत. तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 25 जागा आरक्षित आहेत. यामध्ये 13 महिलांसाठी जागा आरक्षित आहेत. अनुसूचित जमातींसाठी 3 त्यापैकी महिलांना 2, अनुसूचित जातीसाठी 8 त्यापैकी महिलांना 4 जागा आरक्षित आहेत. अशा प्रकारे शिरूर तालुक्‍यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत येत्या 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. यामध्ये त्या त्या ग्रामपंचायतच्या यापूर्वीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाचा विचार करून प्रवर्गानुसार आरक्षण जाहीर होणार आहे.

तरुण मंडळीचे गुडघ्याला बाशिंग
सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे गावकरभाऱ्यांनी अनेक तर्कवितर्क बांधायला सुरुवात केली आहे. शिरूर तालुक्‍यातील तरुण मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होऊ लागली आहे. तरुणाई विविध माध्यमांतून नागरिकांपर्यंत पोहचून सामाजिक कार्यातून आपला ठसा उमठवत आहेत. तालुक्‍यातील तरुणांनी निवडणूकीसाठी आपली तयारी जोरदार सुरू केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.