हडपसर – लेकरांनो, तरुणांनो, प्रौढांनो तुम्हाला जगायचे आहे, मरून चालणार नाही. कुटुंबासाठी तुम्हाला जगावंच लागेल. करोनाचा अंधार संपणार आहे. ही वेळ कसोटीची आहे आणि ही कसोटी आपण पार करायची आहे. करोना करोना करत बसून चालणार नाही, योग्य काळजी घेतली तर आपल्या सावलीलाही करोना थांबणार नाही, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी केले.
ज्येष्ठ समाजसेविका अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांनी मगरपट्टासिटीमधील लसीकरण केंद्रावर लसीचा दुसरा डोस घेतला. यावेळी नगरसेविका हेमलता मगर, माजी उपमहापौर नीलेश मगर उपस्थित होते.
तोंडाला मास्क लावा, गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवा ही वेळ म्हणजे आज जगण्याची कसोटीच आहे. करोनावर संघर्ष करून विजय मिळवायचा आहे, अशी खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे. प्रत्येकाने एकमेकांची काळजी घ्या. सर्व समाजाला तारेवरची कसरत करायची आहे. उद्याचा दिवस आपलाच आहे. त्यामुळे मोठ्या धाडसाने या करोनाचा सामना एकत्रपणे करू, असा विश्वास सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केला.