सायबर हल्ल्यात नुकसान झालेच नाही

पिंपरी -पिंपरी-चिंचवडच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरवर झालेल्या सायबर हल्ल्यात (रॅन्समवेअर) सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज महापालिकेच्या वतीने काम पाहणाऱ्या टेक महिंद्रा कंपनीने पोलीस तक्रारीत केला होता. त्यानंतर झालेल्या नुकसानीबद्दल खुलासा करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयुक्त राजेश पाटील यांनी टेक महिंद्रा कंपनीला नोटीस बजावली होती.

दरम्यान, कंपनीने पाच कोटी रुपयांचे नुकसान झालेलेच नाही, अशी प्रांजळ कबुली पत्राद्वारे देत “यू टर्न’ घेतला आहे. फक्त 27 सर्व्हरवर त्याचा परिणाम झाला आहे आणि ते त्याच्या पुनर्बांधणीपुरते मर्यादित आहे, असे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करून स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरमधून डेटा इनक्रिप्ट करण्यात आला होता. तो हवा असल्यास बिटकॉइनची मागणी हॅकर्सने केली होती. या सायबर हल्ल्यात सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज महापालिकेच्या वतीने काम पाहणाऱ्या टेक महिंद्रा कंपनीने पोलीस तक्रारीत केला होता. महापालिका प्रशासनाने त्यानंतरही शांत राहणेच पसंत केले होते. या एकूण प्रकऱणात सायबर हल्ल्याच्या निमित्ताने 5 कोटी रुपयांचा विमा लाटण्याचा डाव असल्याचा संशय ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी व्यक्‍त केला होता.

सर्व प्रकऱणाची सखोल चौकशी कऱण्याची मागणी त्यांनी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका आयुक्‍त राजेश पाटील यांच्याकडे केली होती. त्यानंतर महापालिका आयुक्‍तांनी टेक महिंद्रा कंपनीला नोटीस काढली होती. सायबर हल्ल्यामागची वस्तुस्थिती काय आहे, याबाबत त्यांनी कंपनीला विचारणा केली होती. सुरुवातीला पोलीस तक्रार दाखल करताना, सायबर हल्ल्यामुळे 5 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा कऱणाऱ्या टेक महिंद्रा कंपनीने केला होता. आता मात्र महापालिकेला दिलेल्या पत्रात अगदी “यू टर्न’ घेतला आहे. पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले नसल्याची कबुली दिली आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरवर झालेल्या सायबर हल्ल्यातील नुकसानीची माहिती घेण्यासाठी टेक महिंद्रा कंपनीला नोटीस बजावली होती. त्यांनी त्याबाबतचा खुलासा दिलेला आहे.
– राजेश पाटील, आयुक्‍त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी कंपनी

प्रकल्पाच्या सर्व्हरवर झालेल्या सायबर हल्ल्यात 5 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज टेक महिंद्रा कंपनीने सुरूवातीला वर्तविला होता. मात्र, हे नुकसान 27 सर्व्हरपुरते मर्यादित असल्याचे कंपनीने लेखी उत्तरात कळविले.
– नीळकंठ पोमण,सह-मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.