पालकमंत्री मुश्रीफ यांच्यावरील नाराजीवर अखेर पडदा

नगरच्या राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद पुण्याच्या सरहद्दीवर मिटला

नगर -पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविषयी नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेतेच नाराज होते. तथापि, त्याची जाहीर चर्चा झाल्याने दस्तुरखुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच दखल घेतल्याने आज अखेर या नाराजीवर पडदा पडला. जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस अंतर्गत निर्माण झालेले वादंग अखेर आज पुण्याच्या सरहद्दीवरील शिरूरमधील बैठकीत शांत झाले.

तथापि, बैठकीतील चर्चेचा मसुदा माध्यमांना कोणीही देऊ नये, अशी तंबी नेत्यांनी दिली. पालकमंत्री मुश्रीफ यांच्या कार्यपद्धतीवर पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी, आमदार व कार्यकर्तेही अगदी सुरुवातीपासूनच नाराज होते. त्यात ज्येष्ठ नेते बाळासाहेब जगताप यांनी या वादाला थेट सोशल मीडियावर व्यक्त होऊन तोंड फोडले. दरम्यान, त्या संदर्भातील वृत्त दैनिक प्रभातने प्रकाशित केल्याने त्याची पक्षाने गंभीर दखल घेतली. पक्षाचे नगरचे निरीक्षक अंकुश काकडे यांनी पुढाकार घेऊन ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील एका हॉटेलमध्ये मोजक्‍या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत करोनाच्या पार्श्‍वभूमीवरील संकट, फिजिकल डिस्टन्स आदी कारणांमुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचीच गर्दी होऊ नये, म्हणून कुणला निमंत्रणे दिली नसल्याचे पालकमंत्री यांच्यातर्फे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती एका नेत्याने “प्रभात’शी बोलताना दिली. तथापि, यापुढे पक्षाचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेण्याचे आश्‍वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. त्यावर कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार संग्राम जगताप, आमदार रोहित पवार, आमदार नीलेश लंके, आमदार आशुतोष काळे, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर आदींसह पक्षाचे मोजके पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ यांचे कानावर हात…!
पुणे जिल्ह्यातील शिरूरमधील एका हॉटेलमध्ये पार पडलेल्या या बैठकीविषयी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र कानावर हात ठेवले. पक्षाचे पदाधिकारी, आमदार किंवा नेत्यांची अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे त्यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले.

पक्षाचे मोजके नेते, आमदार व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. करोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या कामाची माहिती पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांना दिली. त्यातून कार्यकर्त्यांचे समाधान झाले आहे. कोणीही आता नाराज नाही. त्यासोबत आता भाजपतर्फे करण्यात येणाऱ्या आंदोलनास तोंड देण्यासाठीच्या सूचना पक्षाचे नेते, आमदार व पदाधिकाऱ्यांना या बैठकीत दिल्या.
अंकुशराव काकडे निरीक्षक, राष्ट्रवादी कॉंग्रेस, नगर.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.