श्रीलंकेतील सौंदर्य स्पर्धेतील गोंधळावर अखेर पडदा; विजेतीला पुन्हा केला मुकुट बहाल

कोलंबो – श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये मागील आठवड्यात पार पडलेल्या ‘मिसेस श्रीलंका’ या सौंदर्य स्पर्धेत गोंधळ घालणाऱ्या ‘मिसेस वर्ल्ड’ला अटक करण्यात आली आहे. ‘मिसेस वर्ल्ड’ कॅरोलीन जूरी विरोधात स्पर्धकांना जखमी करणे आणि संपत्तीचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॅरोलीनसह मॉडेल चूला पद्मेंद्रलाही पोलिसांनी अटक केली आहे. या दोघींनीही शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या सौंदर्यवती स्पर्धेत हजेरी लावली होती. मिसेस श्रीलंका स्पर्धेत पुष्पिका डिसिल्वा ही स्पर्धक विजयी ठरली होती. त्यानंतर जूरीने डिसिल्वा ही घटस्फोटित असल्याचा दावा करत तिच्या विजेतेपदाचा मुकूट जबरदस्तीने काढून घेतला होता. या दरम्यान पुष्पिकाच्या डोक्‍याला जखमही झाली होती. या प्रकरणात चौकशी केल्यावर पुष्पिकाचा घटस्फोट झाला नसून ती पतीपासून विभक्त राहत असल्याचे उघड झाले होते. मात्र लाइव्ह कार्यक्रमातच हा सगळा प्रकार घडल्यामुळे प्रचंड गदारोळ माजला होता व पुष्पिकाने त्याची कायदेशीर तक्रारही दाखल केली होती.

आयोजकांनी झालेल्या या प्रकारावर पुष्पिकाची माफी मागितली आणि तिला पुन्हा एकदा विजेतेपदाचा मुकूट प्रदान केला. पुष्पिका डिसिल्वाने या प्रकाराची पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.