राजस्थानात महिनाभराच्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा

गहलोत सरकारने जिंकला विश्‍वास दर्शक ठराव

जयपुर: राजस्थानातील राजकीय अस्थिरता आज झालेल्या विश्‍वासदर्शक ठरावावरील मतदानानंतर संपुष्ठात आली. हा ठराव अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारने 125 विरूद्ध 75 मतांनी जिंकला. आजच्या या आकडेवारीनुसार बंडखोर 19 आमदार जरी सरकारच्या विरोधात गेले असते तरी हे सरकार तरलेच असते हे स्पष्ट झाले आहे. आज या ठरावावर विधानसभेत जोरदार गरमागरमी झाली. तथापि आता यापुढे एकदिलाने राज्यातील जनतेच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी कार्यरत राहण्याची ग्वाही सरकारच्या वतीने देण्यात आली.

आजच्या या ठरावावर सचिन पायलट यांचेही चमकदार भाषण झाले. पण त्यात त्यांच्या तिरकस उद्‌गारांनी अद्याप सारे काही आलबेल नाही असा निष्कर्ष काही राजकीय निरीक्षकांनी काढला आहे.

सचिन पायलट यांच्याकडील उपमुख्यमंत्रीपद काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना आज सभागृहात बसण्यासाठी दुसरी जागा देण्यात आली. ही जागा विरोधकांच्या बाजुला दुसऱ्या ओळीत देण्यात आली आहे. त्याचा संदर्भ देत पायलट यांनी नमूद केले की मला सरहद्दीवरील जागा देण्यात आली आहे. पण नेहमी शूर योध्यालाच सरहद्दीवर पाठवले जाते त्याच हेतूने मला येथे ही जागा देण्यात आली असावी अशी टिप्पणी त्यांनी केली.

आजच्या कॉंग्रेस ऐक्‍याचे श्रेय त्यांनी गेहलोत यांना न देता दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींनाच दिला. आजचा विश्‍वास दर्शक ठराव हा सत्त्याचा आणि लोकांचा विजय असेल तसेच कॉंग्रेस आमदारांच्या एकतेचाही तो विजय असेल असे मुख्यमंत्री गेहलोत यांनी प्रत्यक्ष मतदाना आधी प्रसारीत केलेल्या संदेशात नमूद केले होते.

आज सभागृहात बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. राज्यात करोनाचे मोठे संकट असताना भाजपने राज्यात राजकीय अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न केला असा आरोपही त्यांनी केला. राजस्थानातील लोकनियुक्त सरकार पाडणे हाच भाजपचा एकमेव डाव होता पण तो कॉंग्रेस आमदारांच्या ऐक्‍यातून हाणून पाडण्यात आला आहे असे ते म्हणाले.

या चर्चेला सुरूवात करताना कॉंग्रेसचे शांतीकुमार धारीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा गौरव करून त्यांनी भाजपला धडा शिकवला आहे असे विधान केले. आम्ही भाजपला येथे गोवा किंवा मध्यप्रदेश सारखा प्रकार करण्यापासून रोखले, मोदींची मोडस ऑपरेंडी येथे फेल गेली असे ते म्हणाले.

कॉंग्रेस मध्ये विलीन झालेल्या बहुजन समाज पक्षाच्या सहा आमदारांनी सरकारच्या बाजूनेच मतदान केले. या सभागृहात भाजपचे 72 सदस्य असून त्यांना अन्य तीन अपक्षांचा पाठिंबा आहे. आजच्या विजयामुळे सरकारला पुढील सहा महिने तरी कोणताहीं धोका नाही. कारण त्या अवधीत सरकारच्या विरोधात अविश्‍वास ठराव आणता येत नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.