शॉर्ट फिल्म कॉर्नर : शिक्षणाची गरज सांगणारी कप ऑफ टी

या लघुपटाची सुरुवात फोटोग्राफर श्रद्धा या मुलीपासून होते. एका छोट्याश्‍या गावात नैसर्गिक सौंदर्य अनुभवत असते. त्याचवेळी तिचे लक्ष गावातील एका लहान मुलाकडे जाते. तो श्रद्धाला पाहून हळूच हसतो. तीही त्याला पाहून हसते. त्याचवेळी तो लहान मुलगा पटकन श्रद्धाची बॅग उचलून पळतो. त्याला पकडायला श्रद्धाही त्याच्या मागे धावते. पळत असताना तो मुलगा श्रद्धा मागे येत असल्याची सातत्याने खात्री करत असतो. आणि तिच्या हातात न येण्यासाठी वेगाने पळत होता.

थोड्या वेळाने तो मुलगा एका जंगलाच्या मध्ये जाऊन थांबतो. श्रद्धा त्याठिकाणी पोहचल्यावर तिच्या सभोवताली लहान-मोठे गावातील सर्वच जण घोळका करून थांबलेले असतात. त्यांच्या हातात पाटी, पेन्सिल, खडू आणि वही असते. ती हे सर्व पाहून आश्‍चर्यचकित होते. तो मुलगा श्रद्धाची बॅग तिच्यासमोर धरतो आणि दुसरीकडे एक लहान मुलगी खडू समोर धरते. तिच्या मागे एक वृद्ध पाटीवर चहाचा कप घेऊन उभी असते. श्रद्धा आजूबाजूला बघते आणि चहाचा कप उचलते. हे पाहून सर्व गावकरी जल्लोष करतात. व श्रद्धा गावकऱ्यांना शिकवण्यास सुरुवात करते.

भारतात ग्रामीण भागात आजही अनेक लोक अशिक्षित आहेत. यातील अनेकांना शिकण्याची इच्छा असते. परंतु, सोयी उपलब्ध नसल्याने त्यांना शिक्षण घेता येत नाही. सरकारने त्यांच्या गावातच शिक्षणाची सोयी उपलब्ध करून दिली तर नक्कीच बदल घडेल. परंतु, अनेकदा ग्रामीण भागात शिक्षक जाण्यास तयार नसतात. त्यामुळे त्यांचीही मानसिकता बदलण्याची गरज आहे.

– श्‍वेता शिगवण

Leave A Reply

Your email address will not be published.