माय-लेकींची संस्कृती…

उषा बन्सल आणि डॉ. प्रियंका बन्सल

कोणीही उपाशीपोटी झोपू नये आणि अन्न वाया जाऊ नये, गरीब मुलांना चांगले आयुष्य आणि शिक्षण मिळावे याला बन्सल परिवाराने आपल्या जीवनाचे ध्येय बनविले आहे. त्यांनी “खाना बचाओ, खाना खिलाओ’ या संस्थेच्या माध्यमातून या कार्यात आपल्यासोबत शेकडो लोकांना जोडले आहे. डॉ. प्रियंका बन्सल या दंत चिकित्सक असून, पाश्‍चात्य देशात शिक्षण घेत त्यांनी इम्प्लांटबाबतचे अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत केले आहे.

लहानपणापासून वडिलांनी कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. यामुळे उपाशी राहणे आणि भूक याबाबत त्यांना काहीही माहिती नव्हती. त्यांनी एकदा उपवास केला आणि पहिल्यांदा त्यांना भूकेची जाणीव झाली. आपण आपल्या इच्छेनुसार उपवास करत आहोत, परंतु ज्यांना नाइलाजास्तव उपाशी रहावे लागत असेल, त्यांच्या अवस्थेविषयीच्या कल्पनेनेच डॉ. प्रियंका बन्सल यांना अस्वस्थ केले. यातूनच “खाना बचाओ, खाना खिलाओ’ या संकल्पनेचा उदय झाला. आज देशभरात “खाना बचाओ, खाना खिलाओ’च्या माध्यमातून शेकडो तरुण कोणत्याही कार्यक्रमात शिल्लक राहिलेले अन्न गरीबांपर्यंत पोहचविण्याचे काम दररोज करत आहेत.

डॉ. प्रियंका बन्सल यांनी आपले काम केवळ अन्नदानापुरतेच सीमित न ठेवता रस्त्यावर राहणाऱ्या आणि चौकांमध्ये भीक मागणाऱ्या मुलांना शिक्षण कसे देता येईल, या दिशेने देखील प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच वेगवेगळ्या आश्रमातून जाऊन त्या मुलांची आरोग्य तपासणीही करतात. अशाच एका आश्रमातील मुलांच्या आरोग्यासाठी चांगले बाथरुम आणि गरम पाण्याची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तिथे सोलर सिस्टीम आणि बाथरुम तयार करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होणार होता. त्यासाठी त्यांनी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू केले. या कामात त्यांच्या कुटुंबियांनीही त्यांना खूप मदत केली. आश्रमातील मुलांच्या आरोग्यासाठी सोलर सिस्टीम आणि बाथरुम मिळावे यासाठी डॉ. प्रियंका बन्सल यांच्या आई उषा बन्सल यांनी तब्बल सातशे किलो लोणचे तयार करुन विकले. या लोणच्याच्या विक्रीतून येणारी भांडवलासहित सर्व रक्‍कम आश्रमातील मुलांच्या बाथरुम आणि सोलर सिस्टीमसाठी देण्यात आली. तसेच संपूर्ण बन्सल कुटुंबानी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतले. उषा बन्सल या पाककलेत खूप प्रवीण आहेत. ते दरवर्षी लोणचे बनवून आपल्या नातेवाईकांना द्यायच्या. त्यांच्या हाताची वेगळीच चव असल्याने दरवर्षी नातेवाईक त्यांचे लोणचे येण्याची वाट पाहतात.

डॉ. प्रियंका बन्सल यांनी आपल्या आईला हेच लोणचे मोठ्या प्रमाणात बनविण्यास सांगितले. एवढ्या मोठ्या प्रमाणात बनविणे आपल्याला शक्‍य होणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यावर आपल्या अंगणातील आंब्याच्या झाडाला जेवढ्या कैऱ्या आल्या आहेत. तेवढे बनविण्यासाठी डॉ. प्रियंकानी आपल्या आईला तयार केले. त्यानंतर पुन्हा प्रोत्साहन देत बाजारातून आणखी कैरी आणून लोणचे तयार करण्यास सांगितले. उषा बन्सल यांनी आपल्या मुलीला सांगितले की, तुला जेवढी रक्‍कम हवी आहे, तेवढी मी देते. परंतु डॉ. प्रियंका म्हणाल्या की या कार्यात सर्वांचा सहभाग असायला हवा. जे लोणचे विकत घेतील त्यांचाही आणि जे बनवतील त्यांचाही. संपूर्ण कुटुंब या कार्यात जुंपले गेले आणि मोठ्या प्रमाणात लोणचे तयार करुन सर्वांनी विकले. याबाबत उषा बन्सल यांनी सांगितले की, सामाजिक कार्याची प्रेरणा मला माझ्या मुलीकडूनच मिळाली.

यासोबतच डॉ. प्रियंका बन्सल यांनी सुरू केलेल्या फ्रायडे ऍप्पल डे या प्रोजेक्‍टसाठीही संपूर्ण कुटुंबाने आणि मित्रांनी त्यांना मदत केली. डॉ. प्रियंका बन्सल यांचे वडील विनोद बन्सल हे देखील आपल्या मुलीसोबत सामाजिक कार्यासाठी नेहमीच तयार असतात. कोणत्याही समारंभात गेल्यानंतर समारंभ संपेपर्यंत ते उपस्थित राहतात आणि जर अन्न शिल्लक राहिले असले, ते स्वतःच्या कारमधून नेऊन त्या अन्नाचे वाटप करतात. विनोद बन्सल हे एक मोठे उद्योजक असून आपल्या कामाच्या सर्व व्यापातून ते सामाजिक कार्यासाठी वेळ काढतातच. पिंपरी-चिंचवड आणि उपनगरातील अर्धपोटी भुकेल्या चिमुकल्यांसाठी ‘खाना बचाओ, खाना खिलाओ’ ही संस्था मोठा आधार ठरत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही संस्था आता खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहे. विविध स्तरांवरील शेकडो नागरीक स्वतःहून या संस्थेशी जोडले गेले. या संस्थेचे खूप मोठ्या प्रमाणावर व्हॉट्‌स ऍप ग्रुप आहेत. हे कार्य करणाऱ्या सर्वांना लीडर असे संबोधले जाते. हे सदस्य अन्न उरले असेल तर फेकूनका, आमच्याशी संपर्क करा, असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असतात. कुठून जरी फोन आला तरी या ग्रुपमधील सदस्य त्या ठिकाणच्या ग्रुपला संदेश पाठवतात आणि जो लीडर जवळ असेल, तो जाऊन अन्न घेतो व त्याचे वाटप करतो. पिंपरी-चिंचवड शहरात 300 ते 400 लीडर आहेत. ही संकल्पना आता देशभर पसरत असून त्यालाउत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

डॉ. प्रियंका म्हणतात की, भूक आणि कुपोषणाने रोज सात हजार लोकांचा बळी जात आहे. तर दुसरीकडे हजारो टन अत्र कचऱ्यात फेकले जात आहे. प्रशासन, सरकारी यंत्रणा नक्कीच आपल्या पद्धतीने उत्तम काम करत आहे. परंतु, सामाजिक बांधिलकीतून आम्ही या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. ही संस्था केवळ रस्त्याच्या कडेला झोपणाऱ्या गरिबांनाच अन्न देत नाही, तर कित्येक आश्रमांमध्ये जाऊन तेथील मुलांच्या आरोग्याची आणि शिक्षणाची देखील काळजी घेत आहे. डॉ. प्रियांका आणि त्यांच्या कुटुंबियांच्या या उदात्त कार्याला सलामच केला पाहिजे!

आजची तरुण पिढी कशात आनंद मानते? चांगले कपडे, गाडी, महागडे मोबाईल, हॉटेलिंग आणखी बरेच काही… पण डॉक्‍टरकीचे शिक्षण घेतलेली एक उच्चशिक्षित तरुणी दिवसा आणि रात्री जेवण घेऊन गरजू भुकेल्यांचा शोध घेत हिंडते, त्यांना ते जेवण देते आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानालाच आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठा आनंद मानते, याला काय म्हणावे? कौटुंबिक संस्कार आणि समाजातील उपाशी व अर्धपोटींबद्दल असलेली खरीखुरी तळमळ हेच या तरुणीला हे जगावेगळे काम करायला भाग पाडत आहे. या तरुणीचे नाव आहे. डॉक्‍टर प्रियंका बन्सल. तिच्या सर्व सामाजिक कार्यांमध्ये त्यांच्या आई उषा विनोद बन्सल यांची खंबीर साथ तिला मिळत असते. डॉ. प्रियंकाचे वडील विनोद शिवनारायण बन्सल हे देखील केवळ त्यांच्या कार्यांला प्रोत्साहनच देत नाहीत, तर स्वतः परिश्रम घेऊन कार्य पार पाडण्यास मदतही करतात. बन्सल माय-लेकींनी दातृत्त्वाची संस्कृती स्वीकारल्याचे अधोरेखित झाले आहे.

डॉ. प्रियंका बन्सल यांना त्यांच्या कार्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडून पुरस्कार आणि सन्मानाने गौरवान्वित करण्यात आले आहे. त्या म्हणतात की, पुरस्काराने जबाबदारी अजून वाढली असून आता कामाची सुरुवात झाली आहे. भविष्यात आणखी बरेच उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. त्यांच्या आगामी कार्यासाठी त्यांचे वडील विनोद बन्सल आणि आई उषा बन्सल या देखील उत्सुक आहेत. विनोद बन्सल हे कोणत्याही वेळी “खाना बचाओ, खाना खिलाओ’च्या उपक्रमासाठी तयार असतात. तसेच रात्री-अपरात्री देखील आपल्या कारमधून गरजूंना अन्न वाटप करण्यासाठी कायम तत्पर असतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.