पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईड कामरानचा खात्मा

चकमकीत जैशच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

मेजरसह चार लष्करी जवानही शहीद

श्रीनगर – भारतीय जवानांनी जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्याचा पहिला बदला घेतला आहे. भारतीय जवानांनी पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कामरानचा खात्मा केला आहे. तसेच जैशचा आणखी दोन दहशतवादीही ठार केले आहे.

काश्‍मीरात पुलवामा जिल्ह्यात झालेल्या 16 तासांच्या चकमकीत बारा जण ठार झाले आहेत. त्यात जैश ए महंमदच्या तीन दहशतवाद्यांचा समावेश आहे. या चकमकीत लष्कराच्या एका मेजरसह अन्य तीन जवानही शहीद झाले आहेत. घटनास्थळी झालेल्या गोळीबारात पाच नागरीकही ठार झाल्याचे वृत्त आहे. मेजर व्ही. एस. डॉन्डियाल, हवालदार सेवराम, शिपाई अजय कुमार आणि शिपाई हरि सिंह अशी शहीदांची नावे आहेत.

गेल्या 14 फेब्रुवारीला ज्या ठिकाणी सीआरपीएफ जवानांच्या बस ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. त्याच ठिकाणापासून 10 किमी अंतरावरच ही चकमक झाली. या चकमकीत ठार झालेले दहशतवादी या हल्ल्याच्या घटनेशी संबंधीत होते अशी माहिती मिळते आहे.

यातील दोन दहशतवाद्यांची ओळख पटली असून एकाचे नाव कामरान असे असून हा जैश-ए-मोहम्मदचा जम्मू-काश्‍मीरमधील कमांडर आहे. पुलवामा, अवंतीपुरा आणि त्राग या भागात तो सक्रिय होता. त्याने पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. 8 फेब्रुवारीला त्याने इंटरनेटवरुन संवाद साधला होता.

मारल्या गेलेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव हिलाल अहमद असे आहे आणि तो जैश ए महंमद या संघटनेशी संबंधीत आहे. तो या संघटनेचा प्रमुख मौलाना मसुद अझर याचा निकटचा साथीदार असल्याचे सांगितले जात आहे.

चकमकीच्या घटनेनंतर सुरक्षा दलांनी या परिसराची नाकेबंदी करून कसून शोध मोहीम हाती घेतली आहे. या भागात काही दहशतवादी आले असल्याची माहिती लष्कर व सुरक्षा दलांना काल रात्रीच मिळाली होती. त्यानुसार त्यांनी काल रात्रीपासूनच तेथे नाकाबंदी केली होती.

नाकाबंदीवरील काही जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर ही चकमक झाली. ती बराच वेळ सुरू होती. घटनास्थळी दोन दहशतवाद्यांची प्रेते मिळाली असली तरी त्यांचे अन्यही काही साथीदार या भागात अजून लपुन बसले असण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.