बारामती (प्रतिनिधी) – राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजित पवार यांच्यावर ईडीच्या माध्यमातून गुन्हे दाखल झाल्याच्या निषेधार्थ बारामती शहरात बंद पाळण्यात आला. ‘एकच वादा अजित दादा’, ‘एकच साहेब पवार साहेब’ अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांनी बारामती येथे गर्दी केली.
शरद पवार तसेच अजित पवार यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचा आरोप करत बारामती बंदची हाक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बारामती शहरात बंद पाळण्यात आला. व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवून या कारवाईचा बारामतीकरांनी निषेध केला. बारामती शहरातील बंदच्या पार्श्वभूमीवर बारामतीत अतिशय कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
या दिल्या घोषणा
‘एकच वादा अजित दादा’, ‘एकच साहेब पवार साहेब’, ‘पवार साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘कोण आला रे कोण आला नरेंद्र मोदी-अमित शहा यांचा बाप आला’, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय’ अशा प्रकारच्या घोषणा देत शहरातील भिगवण चौकात कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला.
बारामतीचे बस स्थानक, रेल्वे स्थानक तसेच महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची उपस्थिती दिसत आहे. आज बारामतीकरांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होत आपले व्यवहार बंद ठेवले आहेत. मात्र औषधांची दुकाने दवाखाने यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू आहेत.
आज ठिकठिकाणी लोक एकत्र जमून या कारवाई संदर्भात चर्चा करताना दिसत आहेत. आचारसंहिता सुरू असल्यामुळे तसेच 144 कलम लागू असल्यामुळे निषेध सभेचे आयोजन रद्द केल्याचे काही ज्येष्ठ मंडळींनी सांगितले. दरम्यान बारामतीतच तणावपूर्ण शांतता जाणवत होती.
दरम्यान, शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध म्हणून आज बारामती शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी देखील या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र तात्काळ किंवा अति तात्काळ सेवा देण्यासाठी सर्व दवाखाने सज्ज होते. बारामती शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना देखील आज सुट्टी देण्यात आली होती.