मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) झालेल्या हिंसाचाराचा निषेध करताना “फ्री काश्मीर’चा फलक झळकवणाऱ्या तरूणीचा हेतू काय होता याची पोलीस चौकशी सुरु आहे. मात्र, प्राथमिकदृष्ट्या तिचा हेतू चुकीचा नव्हता, असे दिसून येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द केला जाऊ शकतो, असे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे दिले.
जेएनयुतील हिंसाचाराचा निषेध म्हणून गेट वे ऑफ इंडियाजवळ मुंबईतील विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी तीव्र निदर्शने केली. या निदर्शनात महक प्रभू या तरूणीने “फ्री काश्मीर’चा फलक झळकावला. या फलकावरून विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहे. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर आज विधानभवनात पत्रकारांशी बोलताना देशमुख यांनी महक प्रभूवर दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचे सूतोवाच केले.
जेएनयुतील हिंसाचाराची घटना दुर्दैवी आहे. मी यासंदर्भात अहवाल मागवला आहे. “फ्री काश्मीर’चा फलक कुणी तयार केला याचीही चौकशी सुरू आहे. प्रीै काश्मीरचा फलक दाखविणाऱ्या तरूणीचा हेतू चुकीचा नव्हता. काश्मीर खोऱ्यात इंटरनेट सेवा बंद आहे. स्थानिक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हा फलक झळकवण्यात आला. मात्र, प्राथमिकदृष्ट्या तिचा हेतू चुकीचा नव्हता असे दिसून येत असल्याचे देशमुख म्हणाले.