विजयाचे श्रेय नवोदितांचे – द्रविड

बेंगळूरू  – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघातील नवोदितांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. त्यांनी केलेल्या जबाबदार खेळामुळेच भारतीय संघाने ही मालिका जिंकली. मात्र, त्यासाठी मला का श्रेय दिले जात आहे. खरे सांगायचे तर मी काहीच केले नाही, हे सर्व यश नवोदितांचेच आहे, अशा शब्दात भारतीय संघाचा माजी कर्णधार व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडने मत व्यक्‍त केले. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये बॉर्डर-गावस्कर करंडकावर 2-1 च्या फरकाने आपले नाव कोरणाऱ्या भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या भारतीय संघातील अनेक शुभमन गिल, ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर, महंमद सिराज, वॉशिंग्टन सुंदर या नवोदित खेळाडूंनी अफलातून कामगिरी केली.

त्यांच्या या कामगिरीच्या मागे खरा प्रेरणास्रोत द्रविडच असल्याचे सांगत देशभरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र, असे श्रेय घेण्याची माझी इच्छा नाही. हा विजय संघातील नवोदितांचाच आहे व विजयाचे तेच हक्‍कदार आहेत. मला विनाकारण श्रेय देण्यापेक्षा त्यांच्या कामगिरीला मी सलाम करतो, असे द्रविड म्हणाला.

ऑस्ट्रेलियातील यशासाठी विनाकारण मला श्रेय दिले जात आहे. खरेतर भारतीय संघातील सर्व नवोदित खेळाडूंनी केलेल्या कौतुकास्पद खेळामुळेच भारतीय संघाने ही मालिका जिंकली, असे द्रविड म्हणाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.