रेडा, -इंदापूर तालुक्यात बावडा ग्रामीण रुग्णालय व भिगवण ट्रामा सेंटर रुग्णालयांची मंजुरी व त्यानंतर उभारणीसाठी माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनेक वर्षे पाठपुरावा केला. त्यामुळे या दोन्ही रुग्णालयांच्या उभारणीचे श्रेय इतरांनी घेऊ नये, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी केले.
हर्षवर्धन पाटील यांनी 2012 मध्ये मंत्री असताना बावडा उपकेंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयामध्ये केले. तसेच जागतिक बॅंकेकडून बावडा ग्रामीण रुग्णालय व भिगवण ट्रॉमा सेंटरच्या इमारतीसाठी विशेष निधी मंजूर केला.
बावडा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत उभारणीसाठी जिल्हा परिषद सदस्या म्हणून मी जिल्हा परिषदेमध्ये अधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा केला. तसेच बावडा रुग्णालयातील यंत्रसामुग्री व बेडसाठी सीआरएस फंडातून 10 लाख रुपये मंजूर करून घेतले.
दोन्ही रुग्णालयांमध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या जागा मंजूरीसाठी हर्षवर्धन पाटील यांनी आरोग्यमंत्री यांची भेट घेऊन पाठपुरावा केला तसेच वारंवार पत्रव्यवहारही केला.
त्यामुळेच या दोन्ही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या भरतीस मंजुरी मिळून सुसज्ज अशी रुग्णालये उभी राहिली आहेत. मात्र आता या रूग्णालयांच्या उभारणीचे श्रेय इतर घेत आहेत. मात्र जनतेला वस्तूस्थिती माहित आहे, असे अंकिता पाटील यांनी स्पष्ट केले.