कामशेत : एखादा नेता आमदार झाल्यावर त्याच्या खासगी वाहनावर ‘विधानसभा सदस्य’ असे स्टिकर लावले जाते. प्रत्येक तालुक्यात अथवा विधानसभा क्षेत्रात एकच आमदार म्हणजे विधानसभा सदस्य असतो. परंतु मावळ तालुका याला अपवाद आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, लोणावळा, देहूरोड, कामशेत या शहरांसह मावळच्या ग्रामीण भागातही खासगी वाहनावर महाराष्ट्र विधानसभा सदस्य किंवा आमदार मावळ विधानसभा असे स्टिकर लावलेली वाहने आढळून येतात. यामुळे एकप्रकारे मावळ तालुक्यात ‘प्रतिआमदारां’चे पेव फुटल्याचा प्रकार समोर येत आहे.
आमदार अथवा त्यांची पत्नी यांच्या वाहनांवर विधानसभा सदस्याचे स्टिकर असेल तर गोष्ट निराळी आहे. परंतु मावळात आमदारांचा भाचा, मेहुणा, भाऊ, पुतण्या, जवळचा कार्यकर्ता असे नाते सांगत हे ‘प्रतिआमदार’ फिरत असतात. तालुक्याच्या महत्वाच्या शहरांत आणि एमआयडीसी क्षेत्र असलेल्या ठिकाणी अशा वाहनांचे प्रमाण अधिक आहे.
तालुक्यात अनेकजण स्वतःच्या खासगी चारचाकी वाहनांवर ‘विधानसभा सदस्य’ असे छापील हिरव्या रंगाचे गोल स्टिकर गाडीला चिटकवून हिंडत आहेत. यात अगदी साध्या गाड्यांपासून ते महागड्या अलिशान गाड्यांचा समावेश आहे. यातील अनेकजण तर स्वतःच आमदार असल्याच्या आविर्भावात समाजात व रस्त्यावर वावरतात. वाहनावर महाराष्ट्र विधानसभा सदस्याचे स्टिकर लावल्याने डोक्यात वेगळीच हवा जाते व अशी लोकं वाहतुकीचे नियम सर्रास पायदळी तुडविताना दिसतात. वाहतूक पोलिसही अशा वाहन व चालकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसतात. अगदीच एखाद्या वाहन चालकाला रोखले तर तो एखाद्या नेत्याला फोन फिरवून आपली सुटका करून घेतो.
काही दिवसांपूर्वी दै. प्रभातमध्ये मावळ तालुक्यात काळ्या काचा असलेल्या वाहनांची संख्या अधिक असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी काळ्या काचा असलेल्या वाहनांविरोधात कारवाईचा बडगा उचलला. परंतु ही मोहीम अगदीच मोजकी ठरली. कारण, आजही अशा काळ्या काचा असलेल्या वाहनांची, फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांची संख्या तालुक्यात प्रचंड आहे.
अशी कित्येक वाहने तालुक्यात राजरोस फिरतात, पण त्यांच्यावर वाहतूक पोलीस कारवाई करताना दिसत नाही. त्यात भरीस भर म्हणून आता तालुक्यात प्रतिआमदारांच्या गाड्या रस्त्यावर धावत आहेत. त्यांच्यावरही कारवाई करणे आवश्यक असताना वाहतूक पोलीस तिकडे सपशेल दुर्लक्ष करताना दिसत आहे.
माहिती असूनही कारवाई का नाही ?
मावळात अनेक चौकांत वाहतूक पोलीस उभे असतात. वडगाव, लोणावळा, तळेगाव शहरांत महत्वाच्या चौकात वाहतूक पोलिसांची चौकी असते. अशावेळी प्रतिआमदार असलेले बहादर जेव्हा आमदार विधानसभा स्टिकर लावलेली वाहने घेऊन जातात, तेव्हाच त्यांच्यावर कारवाई का करीत नाही? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. अनेकदा महागडी गाडी, काळ्या काचा व गाडीवर ‘आमदार’ असलेले स्टिकर पाहून सर्वसामान्य नागरिक त्या वाहनाला वाट करून देतात. त्यांना आत कोण आहे, हे महिती नसते. परंतु तालुक्याचे आमदार कोण व त्यांचे खासगी वाहन कोणते याची माहिती असणारे वाहतूक पोलीस मात्र अशा डमी आमदारांच्या वाहनांवर तिथेच कारवाई का करीत नाही, हा प्रश्नच आहे.
कुठल्याही कार्यकर्त्याने अशा प्रकारे आपल्या खासगी वाहनावर स्टिकर लावून फिरणे हे अयोग्य आहे. वाहतूक नियमांची पायमल्ली करणारा हा प्रकार आहे. कार्यकर्ते किंवा इतर कुणीही असे करु नये. नियमांचे पालन करावे. तसेच आपल्या कृतीतून लोकप्रतिनिधींचा अपमान होईल किंवा आपली कायदेशीर अडचण होइल, असेही कृत्य करू नये.
– सुनील शेळके, आमदार, मावळ विधानसभा