डेहराडून – उत्तराखंड या भाजपशासित राज्यात कुंभमेळ्याच्या काळात जो कोविड चाचण्यांचा मोठा घोटाळा झाला आहे, तो घोटाळा माझ्या काळात झालेला नाही, असे मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांनी म्हटले आहे.
तथापि, त्यांच्या या विधानाचा अन्वयार्थ त्यांनी या घोटाळ्याचे खापर अप्रत्यक्षपणे त्यांच्या आधीचे भाजपचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्यावर फोडल्याचे माने जात आहे. त्यामुळे त्रिवेंद्रसिंह रावत यांनीही तातडीने या प्रकाराच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.
विद्यमान मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांनी म्हटले आहे की, कुंभमेळ्याच्या काळात खासगी संस्थांना यात्रेकरूंची कोविड चाचणी घेण्याचे कंत्राट देण्यात आले होते. पण हा निर्णय या आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात घेतला गेला आहे. मी मार्च महिन्यात राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्याच्या आधी हा घोटाळा झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश आपण दिला असून यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. या राज्यात 1 एप्रिल ते 30 एप्रिल या अवधीत कुंभमेळा घेण्यात आला आणि रावत हे 10 मार्च रोजी मुख्यमंत्री झाले आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने या प्रकरणात एक कंत्राटदार कंपनी आणि दोन खासगी लॅबच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या संस्थांनी यात्रेकरूंच्या बनावट चाचण्या करून त्यांना ते करोना निगेटिव्ह असल्याची सर्टिफिकेट वाटली होती. हा घोटाळा कोट्यवधी रुपयांचा आह,े असे तेथील माध्यमांनी म्हटले आहे.