एक मृतदेह सापडला
पाटण – राधिका मनोजकुमार माने या विवाहितेने श्रावण (वय 3) व शिवराज (वय 9 महिने) या मुलांसह सांगवड, ता. पाटण येथे कोयना नदीवरील पुलावरून दुपारच्या सुमारास उडी टाकून आत्महत्या केली. तिचे मूळ गाव म्हसवड, ता. माण हे आहे.
राधिका माने ही भाऊ सोपान ईश्वर पाटील (वय 25, रा. सांगवड, ता. पाटण) यांच्याकडे आली होती. आज दुपारी साडेतीन वाजता घरात कोणालाही न सांगता ती दोन मुलांसह बाहेर पडली. सोपान पाटील यांना ती कोयना नदीवरील पुलाजवळ दिसली. मात्र, ती तेथून उडी टाकेल, असे वाटले नाही. त्यामुळे त्यांनी तिला काही विचारले नाही. त्यानंतर राधिकाने दोन मुलांसह पुलावरून नदीपात्रात उडी मारली. ही घटना समजताच गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. या प्रकरणी सोपान पाटील यांनी पाटण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी नदीपात्रात शोध घेतला असता शिवराजचा मृतदेह हाती लागला. उर्वरित दोघांचा उद्या शोध घेण्यात येणार
आहे.