नागठाणे – सातारा तालुक्यातील एका गावातील गतिमंद महिलेवर वारंवार बलात्कार करून गर्भवती केल्याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच गावातील संदीप उर्फ संतोष हणमंत निकम (वय 29) व एका अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर कोणताही मागमूस नसताना संशयितांना काही तासांतच पकडण्यात बोरगाव पोलिसांसह शाहूपुरी पोलीस, सातारचे निर्भया पथक व महिला विशेष शाखा व सातारा शहरच्या डीबी पथकाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता गतिमंद असून ती गेल्या पाच वर्षांपासून पती व मुलीपासून वेगळी आजोळी राहत आहे. काही दिवसांपूर्वी पीडितेच्या नातलगांना ती गर्भवती असल्याचा संशय आला. त्यांनी तिची वैद्यकीय तपासणी करून घेतली असता, ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर त्यांनी गुरुवारी रात्री बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी पीडितेकडे चौकशी केली असता गावातील काही जणांनी वारंवार बलात्कार केल्याचे तिने सांगितले. मात्र, ती संशयितांना ओळखू शकली नाही. बोरगाव पोलीस, शाहूपुरी पोलीस, निर्भया पथक व सातारा शहर डीबीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेषांतर करून गावात दिवसभर चौकशी केली. त्यानंतर संदीप निकम व एका अल्पवयीन युवकास आज सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. बोरगावचे सपोनि चंद्रकांत माळी, निर्भया पथकाच्या सपोनि माधुरी जाधव, सातारा शहर डीबीचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम व कर्मचाऱ्यानी ही कारवाई केली.