देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर 78 टक्‍क्‍यांहून अधिक

नवी दिल्ली – भारतात कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण बरे होण्याच्या दरातही, सातत्याने वाढ होत असून आता हा दर 78.28 टक्‍के इतका झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 79,292 रुग्ण बरे झाले आहेत. 

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 38 लाख 59 हजारापेक्षा अधिक झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या आणि सक्रिय रुग्णांची संख्या यातील तफावत वाढून आता 28 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. 

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 9 लाख 90 हजारांपेक्षा थोडी अधिक आहे. उपचारांखालील सक्रिय रुग्णांपैकी जवळपास अर्धे रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या केवळ तीन राज्यांत आहेत. तर उत्तर प्रदेश, तमिळनाडू, छत्तीसगढ, ओडिशा, केरळ आणि तेलंगणा या राज्यांमध्ये एकूण एकचतुर्थांश सक्रिय रुग्ण आहेत.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये एकूण रुग्णांपैकी 60.35 टक्‍के रुग्ण आहेत, तसेच या राज्यांत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही साधारण 60 टक्‍क्‍यांच्या जवळपास आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात कोविडमुळे 1 हजार 054 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूंपैकी सुमारे 69 टक्‍के रुग्ण महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि दिल्ली या पाच राज्यांमध्ये आहेत.

देशातल्या एकूण मृत्यूंपैकी 37 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 34.44 टक्‍के मूत्यू झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.