पुणे – केंद्र शासनाने करोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असून या लाटेत 6 वर्षांवरील पुढील मुलांना करोनाचा धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेकडून येरवड्यातील भारतरत्न राजीव गांधी रुग्णालय पूर्ण क्षमतेने वापरण्यात येणार असून या ठिकाणी तब्बल 200 ऑक्सिजन बेडची सुविधा निर्माण केली जाणार आहे.
यात 150 ऑक्सिजन बेड तर उर्वरीत आयसीयू बेड असणार आहेत. हे राज्यातील नव्हे तर देशातील पहिले शासकीय चाइल्ड कोविड केअर सेंटर असणार आहे. या शिवाय या ठिकाणी 30 बेडची क्षमता असलेले कोविड मॅटर्निटी हॉस्पीटल तसेच 20 बेडचे कोविड डायलेसिस सेंटर उभारले जाणार आहे.
पुढील एक ते दिड महिन्यात हे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल आणि आमदार सुनील टिंगरे यांनी दिली. अग्रवाल यांनी महापालिकेच्या भवन विभाग व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह या संपूर्ण हॉस्पिटलची पाहणी केली त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. या हॉस्पिटलसाठी आमदार टिंगरे यांनी एक कोटी रुपयांचा आमदार निधी देण्याचे पत्र दिले असून आणखी लागणारा खर्च ते सीएसआर मधून उपलब्ध करून देणार आहेत. तसेच महापौर निधीतूनही या हॉस्पिटलसाठी 2 कोटींचा निधी देण्यात आला असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
अग्रवाल म्हणाल्या की, तिसऱ्या लाटेची शक्यता घेऊन हे रुग्णालय चाइल्ड कोवीड केअर सेंटर म्हणून उभारले जाईल. त्या ठिकाणी 18 वर्षांच्या आतील मुलांवर करोनाचे उपचार करण्याची सुविधा असणार आहे. त्यानुसार 150 आयसीयू तर 50 आयसीयू बेड असतील तर आयसीयू बेड मध्ये 1 वर्षाच्या आतील मुलांसाठी 12 एनआयसीयू बेड, तर 2 ते 14 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी 20 पीआयसीयू बेड आणि तर 10 आयसीसीयू बेड आणि 8 आयसीयू रिकव्हरी बेड असतील.
या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी राजीव गांधी रुग्णालयातील सर्व जागेचा वापर केला जाणार असून त्यासाठी आवश्यक सुविधा उभारणे, मनुष्यबळ नियुक्ती, स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट उभारणे यासाठी एक ते दिड महिन्याचा कालावधी जाणार असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले, अशा प्रकारचे हे देशातील पहिले मुलांसाठीचे कोविड शासकीय रुग्णालय ठरणार असून या ठिकाणी पालकांसाठीही बेड असणार आहेत. तसेच लहान मुलांची संख्या कमी असल्यास हे बेड इतर वेळी मोठ्या रुग्णांसाठी वापरण्याचे नियोजन असल्याचेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले.