देशातील करोनाविषयक चाचण्यांनी ओलांडला 1 कोटीचा टप्पा

नवी दिल्ली-करोना फैलाव आटोक्‍यात आणण्यासाठी झुंजणाऱ्या भारताने सोमवारी चाचण्यांबाबत महत्वाचा 1 कोटीचा टप्पा ओलांडला. चाचण्यांच्या वाढत्या प्रमाणाबरोबरच करोनाबाधितांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे देशातील करोनाबाधितांची संख्या आता 7 लाखांवर गेली आहे. तर मृतांची संख्या 20 हजारांच्या घरात पोहचली आहे.

भारतात सध्या 1 हजार 105 प्रयोगशाळांमध्ये करोनाविषयक चाचण्या होतात. मागील काही दिवसांपासून चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. त्यातून मागील 14 दिवसांत दरदिवशी सरासरी 2 लाख चाचण्या घेण्यात आल्या. आता दरदिवशी 3 लाख या क्षमतेने चाचण्या होत आहेत. देशातील चाचण्यांच्या संख्येने 1 जुलैला 90 लाखांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर अवघ्या 5 दिवसांतच त्यामध्ये 10 लाखांहून अधिक चाचण्यांची भर पडली.

दरम्यान, देशात रविवार सकाळपासून 24 तासांत नवे 24 हजार 248 करोनाबाधित आढळले. त्यामुळे सलग चौथ्या दिवशी 20 हजारांहून अधिक नवे बाधित नोंदले गेले. देशातील करोनाबाधितांच्या संख्येने 2 जुलैला 6 लाखांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर 7 लाखांचा टप्पा ओलांडण्यास देशाला अवघे 4 दिवस लागले. देशात सर्वांधिक 2 लाखांहून अधिक बाधित महाराष्ट्रात आहेत. तामीळनाडूपाठोपाठ आता दिल्लीनेही बाधित संख्येत 1 लाखाचा टप्पा ओलांडला आहे. गुजरातमध्ये 36 हजारांहून अधिक बाधित आहेत. महाराष्ट्रातच सर्वांधिक बाधित दगावले आहेत. त्यापाठोपाठ दिल्लीत 3 हजारांहून अधिक बळींची नोंद झाली आहे. तर गुजरातमधील मृतांचा आकडा 2 हजारांजवळ जाऊन पोहचला आहे.

करोना संकटाशी मुकाबला करणाऱ्या भारतासाठी बाधित बरे होण्याचे प्रमाण आशादायी ठरत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या 2 लाख 53 हजारांहून अधिक सक्रिय बाधित आहेत. आतापर्यंत सुमारे 4 लाख 25 हजार बाधित करोनामुक्त झाले आहेत. बाधित बरे होण्याचे देशातील प्रमाण 60.85 टक्के इतके आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.