नवी दिल्ली : देशभरातील चार हजार लष्कर कँटीन्सला आयात होणाऱ्या वस्तूंची खरेदी रोखण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे परदेशी मद्यविक्रेत्या कंपन्या नाराज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सर्व लष्कर कँटीनमध्ये मद्य, इलेक्ट्रॉनिक तसेच इतर वस्तू स्वस्त दरात विकल्या जातात. लष्कराचे जवान, अधिकारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना ही सुविधा उपलब्ध आहे. यामधून जवळपास २०० कोटी डॉलर्सची उलाढाल होते. १९ ऑक्टोबरला संरक्षण मंत्रालयाकडून यासंबंधी आदेश जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये भविष्यात थेट आयात केलेल्या वस्तूंची खरेदी हाती केला जाणार नाही असे सांगण्यात आले आहे.
जुलै महिन्यात यासंबंधी लष्कर, हवाई दल आणि नौदलाशी चर्चा करण्यात आली होती याचा उल्लेखही आदेशात आहे. यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मोहिमेला पाठिंबा देण्याचा मुख्य उद्देश आहे. यासंबंधी संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.
आदेशात नेमक्या कोणत्या वस्तूंवर बंदी आहे हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. मात्र यामध्ये आयात होणाऱ्या मद्याचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.