नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून चीन आणि पाकिस्तानपासून देशाला असणारा धोका वाढटच जात आहे. याच परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भारताने अखेर इस्रायलकडून आणखी दोन ‘फाल्कन’ एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम (एवॅक्स) विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
एवॅक्स सिस्टिमला आकाशातील भारताचे नेत्र म्हटले जाते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेला एक अब्ज डॉलरचा हा करार महागड्या किंमतीमुळे रखडला होता. ही इस्रायली एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम रशियन बनावटीच्या इल्यूसीन-७६ विमानावर बसवण्यात येणार आहे. आंतर मंत्रालयीन समितीत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर इस्रायलबरोबर एवॅक्स सिस्टिमचा करार करण्यासाठी सुरक्षेवरील मंत्रिमंडळ समितीची मंजुरी मिळणार आहे.
दोन नव्या फाल्कन सिस्टिमच्या समावेशानंतर भारताकडे असलेल्या एवॅक्सची संख्या पाच होईल. इंडियन एअर फोर्स आधीपासून अशा तीन सिस्टिम वापरत आहे. भारताला पुढच्या तीन ते चार वर्षात इस्रायलकडून ही एवॅक्स सिस्टिम मिळेल. दोन नवीन फाल्कन आधीपासून वापरात असलेल्या तीन फाल्कन एवॅक्स सिस्टिमपेक्षा अधिक अत्याधुनिक असतील असे सूत्रांनी सांगितले. बालाकोट एअर स्ट्राइक, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी फायटर विमानांबरोबर झालेली डॉगफाइट आणि आता लडाख सीमारेषेवर चीन बरोबर निर्माण झालेला तणाव त्या पार्श्वभूमीवर आणखी एवॅक्स फाल्कन सिस्टिमची गरज आहे.