ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना तिरंग्यासह चालताना पाहून देश रोमांचित- पंतप्रधान

नवी दिल्ली : पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 79 वी मन की बातमधून त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला.

ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन चालताना बघून केवळ मीच नाही, तर संपूर्ण देश रोमांचित झाला होता. त्याक्षणी, संपूर्ण देशाने जणू एकत्र येत, आपल्या या योद्ध्यांना विजयी भव म्हटले, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. आपण सगळे मिळून आपल्या या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊया, त्यांचा उत्साह वाढवूया. सोशल मीडियावर देखील ऑलिंपिक खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आता #HumaraVictoryPunch कॅम्पेन सुरु झाले आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, 26 जुलै रोजी, ‘कारगिल विजय दिवस’ही आहे. कारगिलचे युद्ध भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयमाचे असे प्रतीक आहे, जे संपूर्ण जगाने पहिले आहे. यावर्षी हा गौरवास्पद दिवस देखील अमृत महोत्सवाच्या दरम्यान साजरा केला जाणार आहे, असे  ते म्हणाले.

ते म्हणाले की, सात ऑगस्ट रोजी येणारा ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ आपल्यासाठी अशी एक संधी आहे ज्यावेळी आपण प्रयत्नपूर्वक हे काम करु शकतो. राष्ट्रीय हातमाग दिनामागेही खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. याच दिवशी, 1905 साली स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झाली होती, असं ते म्हणाले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.