नवी दिल्ली – थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाच्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. या स्पर्धेच्या इतिहासात पहिलेच विजेतेपद मिळवले. देशाला तुमचा अभिमान वाटतो, असेच यश भविष्यातही मिळवा, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी खेळाडूंचे कौतुक केले.
थॉमस करंडक स्पर्धा भारताने 73 वर्षांनंतर जिंकली. भारताला विजय मिळवून दिलेल्या या सर्व खेळाडूंशी पंतप्रधान मोदी यांनी दूरध्वनीवरूनही संवाद साधला होता व मायदेशी परतल्यावर या खेळाडूंना भेटीसाठी बोलावलेही होते.
त्यानुसार हे सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ व अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांनी खेळाडूंशी वैयक्तिकरित्या चर्चा केली.
भारताने तब्बल 73 वर्षांनंतर थॉमस करंडक जिंकून इतिहास रचला आहे. तुम्ही जे केले तो इतिहास आहे. भारताने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. लक्ष्य सेन, एचएस प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत यांच्याशी बराच वेळ चर्चाही केली.