नवी दिल्ली : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस झाला. दुसरीकडे ऑगस्ट महिन्यात देशभरात सरासरी तापमान २४.२९ अंश सेल्सिअस इतके होते. १९०१ नंतर सर्वात जास्त उष्णता असलेला यावेळचा ऑगस्ट महिना नोंदवला गेला असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.
‘आयएमडी’च्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये देशभरात सरासरी किमान तापमान २४.२९ अंश सेल्सिअस इतके नोंद झाले आहे. हे तापमानापेक्षा ०.६१ अंश सेल्सिअस जास्त होते. १९०१ नंतरचं ऑगस्टमधील यावेळी सर्वात उष्ण तापमान नोंदवले गेले आहे. ऑगस्टमध्ये मध्य भारत आणि दक्षिण भारतात रात्रीचे तापमान खूप जास्त उष्ण राहिले आहे. मध्य भारतात कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा ०.५५ अंश सेल्सिअस जास्त (२४.२६ अंश सेल्सिअस) होते. तसेच दक्षिण द्वीपकल्पीय भारतात सामान्य तापमानापेक्षा ०.७२ अंश सेल्सिअस (२४.१२ अंश) जास्त होते.
ऑगस्ट महिन्यात दक्षिण भारतात २०२.४ मिमी (६.६ टक्के) पाऊस पडला. दरम्यान, या ठिकाणी नोंदवले गेलेले सरासरी किमान तापमान २४.१२ अंश सेल्सिअस होते. इतरवेळी सामान्य २३.४१ अंश अंश सेल्सिअस होते. मध्य भारतात ३५९.६ मिमी (१६.५टक्के) पाऊस पडला. या ठिकाणी सरासरी किमान तापमान २४.२६ अंश सेल्सिअस (२३.७१अंश सेल्सिअस) नोंदवले गेले. दरम्यान, या वर्षीचा ऑगस्ट महिना हा पूर्व आणि ईशान्य भारत आणि वायव्य भारतातील सर्वात उष्ण होता असे आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.