कुआलालंपूर (मलेशिया) – मलेशियामध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने तेथे आणीबाणी लागू करण्यात आली आहे. मलेशियाच्या राजांनी देशभरात आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली. आणीबाणी लागू केल्यामुळे संसद ऑगस्ट महिन्यापर्यंत स्थगित केली जाणार आहे. तसेच नव्याने निवडणूका घेण्यावरही स्थगिती असणार आहे.
अडचणीत असलेले पंतप्रधान मुहयिद्दीन यासिन यांना या निवडणूकांची प्रतिक्षा होती. मात्र आता आणीबाणी लागू केल्यामुळे त्यांच्या अपेक्षा यशस्वी होऊ शकणार नाहीत. ही आणीबाणी म्हणजे लष्करी उठाव अथवा बंड नाही.
या काळात संचारबंदी लागू केली जाणार नाही. नागरी सरकार अस्तित्वातच राहणार आहे. ही आणीबाणी ऑगस्टनंतर सुरू ठेवायची की नाही, याबाबतचा निर्णय करोनाच्या स्थितीवर अवलंबून असेल, असे पंतप्रधान मुहयिद्दीन यासिन यांनी टिव्हीवरून नागरिकांना उद्देशून केलेल्या भाषणात स्पष्ट केले.
मलेशियातील सर्वात मोठे शहर कुआलालंपूर, महानगराचे प्रशासकीय मुख्यालय पुत्राजय आणि करोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या 5 राज्यांमधील लॉकडाऊन बुधवारपासून दोन आठवड्यांसाठी शिथिल केला जाणार असल्याचे मुहयिद्दीन यांनी घोषित केले होते. त्याच पार्श्वभुमीवर आणीबाणी लागू होण्याचा निर्णय अतिशय धक्कादायक आहे.
मलेशियात सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारमधून “युनायटेड मलेशियाज नॅशनल ऑर्गनायजेशन’ या सर्वात मोठ्या घटक पक्षाने पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला आहे. सत्तेत दुय्यम वाटा मिळत असल्याबद्दल या पक्षातील नेते नाराज आहेत. त्यामुळे नव्याने निवडणूका घेण्यास पंतप्रधान उत्सुक होते.
मलेशियातील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून 1 लाख 38 हजारावर पोहोचली असून आतापर्यंत 555 जणांचा मृत्यू झाला आहे.