देशात रोज सरासरी होतात 79 खून

नवी दिल्ली – देशात रोज सरासरी 79 जणांची हत्या होते, अशी माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात देण्यात आली आहे. हा सन 2020 सालातील गुन्ह्यांच्या संबंधातील अहवाल आहे. सन 2020 सालातील खुनाच्या गुन्ह्यांचे प्रमाण हे सन 2019 सालच्या खुनाच्या प्रमाणापेक्षा एक टक्‍क्‍याने अधिक आहे.

सन 2020 मध्ये देशात एकूण 29 हजार 193 जणांची हत्या झाली होती. त्या आधारे रोज सरासरी 79 जणांची हत्या होत असल्याचे स्पष्ट होते आहे. सन 2019 मध्ये हे प्रमाण 28 हजार 915 इतके होते. यातील सर्वाधिक खुनांचे प्रकार उत्तर प्रदेशातील आहेत. सन 2020 मध्ये उत्तर प्रदेशात एकूण 3779 जणांच्या हत्या झाल्या होत्या. त्या खालोखाल महाराष्ट्रात 2163, मध्य प्रदेशात 2101, पश्‍चिम बंगालमध्ये 1948 असे हत्यांचे प्रमाण आहे.

ज्या व्यक्‍तींच्या हत्या झाल्या आहेत, त्यात 45 ते 60 वयोगटातील व्यक्‍तींच्या हत्यांचे प्रमाण हे 16.4 टक्के इतके आहे. त्यातील 38.5 टक्के व्यक्‍ती या 30 ते 45 वयोगटातील आहेत, तर 35.9 टक्के व्यक्‍ती 18 ते 30 वर्षे वयोगटातील आहेत.

तथापि, सन 2020 मध्ये अपहरण आणि व्यक्‍तींना जबरदस्तीने पळवून नेण्याच्या प्रकारात तब्बल 19 टक्के इतकी वाढ झाली आहे. 2020 मध्ये अपहरणाचे एकूण 84 हजार 805 गुन्हे घडले होते. त्याच्या आधीच्या वर्षात या स्वरूपाचे एकूण 1 लाख 5 हजार 36 गुन्हे घडले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.