पुणे : कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासह मेट्रो मार्गासाठी उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. मात्र, पुलाच्या खर्चाचा अंदाज चुकल्याने वाढीव खर्चासाठी महापालिकेकडून महामेट्रो प्रशासनाला तब्बल १४ कोटींचा अतिरिक्त निधी दिला जाणार आहे. त्यासाठीच्या प्रस्तावास शुक्रवारी मनपा स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
या रस्त्यावर मेट्रोच्या कामासोबतच नागपूरप्रमाणे दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला. त्याचे काम महामेट्रोकडे होते. २०२० मध्ये या कामाला मंजुरी देताना स्थायी समितीने ३९ कोटींच्या निधीस मान्यता दिली होती. मात्र, उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचा खर्च १९ कोटी रुपयांनी वाढल्याचे सांगत महापालिकेकडे सुमारे ५८ कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली.
मात्र, हा खर्च जादा असल्याने महापालिकेने या कामाची तसेच खर्चाची तपासणी करण्यासाठी सीओईपीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. तर सीओईपीने केलेल्या तपासणीत अतिरिक्त खर्च १४ कोटींनी वाढत असून तो देण्याची शिफारस महापालिकेस केली. तर महामेट्रोकडूनही हा खर्च मान्य करण्यात आला.