‘नदी सुधार’चा खर्च दीडशे कोटींनी वाढणार

पुणे – नदीसुधार योजनेसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जायका प्रकल्पाचा खर्च अकराशे कोटींपर्यंत वाढणार आहे. या प्रकल्पांच्या कामांना होणाऱ्या विलंबामुळे 950 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी दीडशे कोटी रुपये जादा खर्च करण्याची वेळ आली आहे.

मुठा नदीत येणारे दूषित पाणी, मैलापाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी वापरण्यायोग्य करण्यासाठी जायका प्रकल्प तयार करण्यात आला. यामध्ये मैलापाणी प्रक्रिया केंद्रांची उभारणी केली जाणार आहे, तसेच मैलापाणी, सांडपाण्याच्या वाहिन्यांचे जाळे तयार केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी जपानमधील जायका या संस्थेकडून कर्ज घेतले जाणार आहे.

2015 साली या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली. तेव्हाच्या दरपत्रकानुसार (डीसीआर) या प्रकल्पाचा खर्च 950 कोटी रुपये इतका गृहीत धरण्यात आला होता. मात्र, गेल्या 4 वर्षांत या प्रकल्पाचे काम मार्गीच लागले नाही. पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, तांत्रिक अडचणी, भूसंपादन आदी कारणांमुळे प्रकल्पाचे काम वेळेत सुरूच झाले नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतल्यानंतर या कामांना गती देण्याचा प्रयत्न सुरू झाला. महापालिकेने मुंढवा, भैरोबानाला, नायडू हॉस्पिटल, नरवीर तानाजी वाडी आणि धानोरी येथे मैलापाणी प्रक्रिया केंद्र उभे करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. या कामांच्या निविदा पूर्वीच्या पूर्वगणनपत्रकापेक्षा जादा दराने आल्या. या निविदा रद्द कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

निविदा पडताळणीनंतर छाननी समितीकडे
याबाबत महापालिका प्रशासनाने या निविदा जादादराने आल्याबाबत खुलासा केला असून दाखल निविदा या सद्यस्थिती असलेल्या दरपत्रकानुसार आल्या आहेत. या निविदांची पडताळणी झाल्यानंतर त्या छाननी समितीकडे पाठवल्या जातील. या समितीने मंजुरी दिली तरच जायका संस्थेकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवल्या जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)