भाजप सरकारच्या काळात भ्रष्टाचार करणारे मंत्री श्रीमंत झाले -धनंजय मुंडे 

राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे ऑल ईज वेल नसून नथिंग ईज वेल

मुंबई: राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव आज विधान परिषदेत अनिल परब यांनी मांडला. महाराष्ट्राच्या अवस्थेमध्ये आणि अनिल परब यांच्या अवस्थेमध्य़े काही फरक नाही,  तसेच या सरकारच्या काळात भ्रष्टाचार करणारे १६ मंत्री फक्त खऱ्या अर्थाने श्रीमंत झाले, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी लागावला.

राज्यपालांचा आम्ही आदर करतो. राज्यपालांनी अभिभाषण इंग्रजीमध्ये मांडले. पण हे अभिभाषण म्हणजे ऑल ईज वेल नसून नथिंग ईज वेल आहे, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले. भाजपा सरकारने राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर लोकसभा निवडणूक जिकंली. वास्तविक पाहता आघाडीच्या कार्यकाळात पाकिस्तानला तीन वेळा युद्धात हरवले गेले, नक्षलवाद राष्ट्रवादी सरकारनेच संपवला पण राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर कधी मते मागितली नाहीत, असेही मुंडे म्हणाले.

ईव्हीएमवरील सभागृहातील बोलणं रेकॉर्डवरुन काढण्याचा आग्रह सरकार करत आहे. ईव्हीएमला विरोध याआधी लालकृष्ण अडवाणी, स्व. अटलबिहारी वाजपेयी आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील केला होता, मग आम्ही विरोध केला तर काय चुकलं? असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला.

सरकारने अर्थसंकल्पात जनतेला काय दिले? उलट राज्य सरकारच्या नेतृत्वात राज्य किती कर्जबाजारी झालं हे जाहीर व्हायला हवं होतं. सरकारच्या कट-कारस्थानामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला, दुधाचे अनुदान बंद केले, शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्यांना फसवणारे असे हे सरकार आहे.

भाजपा सरकारच्या काळात बेरोजगारीचे प्रमाणाने उच्चांक गाठला आहे. ७२ रिक्त जागा सरकार ८ महिन्यांत भरू शकले नाही तर ७२ हजार जागा कशा भरणार? असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला. प्लास्टिक बंदी अजुनही झालेली नाही. मेक इन इंडिया योजना फसली. स्व. गोपीनाथ मुंडेंच्या नावाने सुरू केलेले ऊसतोड महामंडळ सरकारने बंददेखील केले.

Leave A Reply

Your email address will not be published.