हैदराबाद – हैदराबादमधील गांधी रुग्णालयात करोनाबाधितांवर उपचार सुरू झाल्यानंतर अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. यात आणखी एका गंभीर आरोपाची भर पडली आहे. करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले.
या रुग्णाचा मृत्यू होऊन आठ तास उलटले तरी याकडे कुणीही लक्ष दिले नाही. यामुळे मृतदेह सडला. तिथे दुर्गंधी पसरू लागली. पूर्ण वॉर्डात दुर्गंधी पसरल्यामुळे तेथील इतर रुग्णांचा याचा त्रास होऊ लागला. दुर्गंधी पसरली तरी रुग्णालयाने याकडे दुर्लक्ष केले. शेवटी दुर्गंधी अधिकच पसरल्यानंतर आयसोलेशनमधील रुग्ण बाहेर आले. त्यानंतर रुग्णांनी अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली.
याबाबत गांधी रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितले की, त्या रुग्णाचा दुपारी 1 वाजता मृत्यू झाला होता. मृतदेहाचा ईजीसी काढण्यास थोडा उशीर झाला. त्यामुळे मृतदेह घेऊन जाण्यास उशीर झाला. मृतदेह 8 तास बेडवरच पडून राहिल्याचे आणि दुर्गंधी पसरल्याच्या तक्रारीचे रुग्णालय प्रशासनाने खंडण केले असून ही अफवा असल्याचे म्हटले आहे.