देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीतील घटना
देहूरोड – करोना बाधित 68 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा घरीच मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांना मृतदेह हलवण्यासाठी तब्बल सात तास रुग्णवाहिकेची वाट पाहवी लागली. ही दुदैवी घटना देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीतील शितळानगर नं. 2 येथे गुरुवारी (दि. 30) घडली.
देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील शितळानगर 2 येथील एका इमारतीतील एका 68 वर्षीय वयोवृद्धेच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झाली होती. नेहमीच उपचारासाठी तिला रुग्णालयात जावे लागत होते. उपचारार्थ रुग्णालयात जाण्यापूर्वी तिची करोना तपासणी करण्यात आली होती. या तपासणीचा अहवाल गुरूवारी सकाळी प्राप्त झाला.
काही वेळानंतर महिलेला अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर ती बेशुद्ध पडली. नातेवाईकांनी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाला याबाबत कळविल्यानंतर काही कर्मचारी आले आणि महिलेची मृत्यू झाल्याचे सांगितले. नातेवाईकांना मृतदेह प्लॅस्टिकमध्ये गुंडाळण्यात सांगून ते निघून गेले. दुपारी बाराच्या सुमारास घडलेल्या या प्रकारानंतर सायंकाळपर्यंत महिलेचा मृतदेह हलविण्यासाठी बोर्डाच्या रूग्णालयाची रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. रुग्णवाहिका, आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांची कमतरता असल्याचे वैद्यकीय अधिकारी सुनीता जोशी यांनी सांगितले.