नगर – महापालिकेची महासभा सुरू असतांनाच विषयपत्रिकेवरील सावेडी दफनभूमी- स्मशानभूमीसाठी 32 कोटी रुपयांची चार एकर जागा खरेदीच्या विषयाला सत्ताधारी शिवसेनेसह काही नगरसेवकांनी विरोध करीत महापौरांना निवेदन दिली. मात्र प्रत्यक्षात महासभेत या विषयावर चर्चा करण्यासाठी अवघे 15 ते 20 नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे फारशी चर्चा न होताच हा वादग्रस्त विषय मंजूर करण्यात आला. ज्या नगरसेवकांनी विरोधात निवेदने दिली. तेच या विषयावर चर्चा करतांना सभागृहातून गायब झाले होते. त्यामुळे या नगरसेवकांच्या निवेदन नाट्याबाबत शाशंकता व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या आज झालेल्या महासभेत विषयपत्रिकेवरील विषय क्रमांक 27 यावरून वादळी चर्चा होईल, असे वाटत असतांना केवळ पाच ते सात मिनिटात चर्चा करून तो मंजूर करण्यात आला. सावेडी उपनगरात स्मशानभूमी नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. याबाबत वारंवार मागणी झाल्याने अखेर महापालिकेने जागा खरेदी करून स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घेतला.
मात्र सावेडी भागातच आरक्षण क्रमांक 58 व 59 या क्रमांकाचे आरक्षण दफनभूमी व स्मशानभूमीसाठी गेल्या अनेक वर्षापासून आरक्षित असतांनाही त्या जागेचा ताबा घेण्याऐवजी महापालिका नव्याने जागा खरेदी करीत असल्याने सत्ताधारी शिवसेनेतील बाळासाहेब बोराटे, मदन आढाव, अमोल येवले, शिंदे गटाचे नगरसेवक अनिल शिंदे यांनी या विषयाला विरोध करून त्याबाबत आपले लेखी निवेदन महापौर रोहिणी शेंडगे यांना दिले. 32 कोटी रुपयांची चार एकर जागा खरेदी करण्यात येणार आहे.
आरक्षण टाकण्यापूर्वी जागा खरेदीचा घाट सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आल्याने नगरसेवकांनी विरोधाची भूमिका घेतली. मात्र प्रत्यक्षात हा विषय आल्यानंतर सभागृहात केवळ 15 ते 20 नगरसेवक होते. केवळ अनिल शिंदे व मदन आढाव यांनी या विषयाला सभागृहात विरोध केला. जागा खरेदीच्या विषयात चुकीचे काही झाले तर गृह विभागात तक्रार करण्यात येईल, असे शिंदे यांनी इशारा दिला. तर आढावा यांनी या विषयाला विरोध दर्शविला. ज्यांनी विरोधाचे निवेदन दिले होते. ते नगरसेवक चर्चेच्या वेळी सभागृहातून गायब झाले होते.
राष्ट्रपुरुषांचे पुतळे बसविण्यावरून संपत बारस्कर, सुरेखा कदम यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. लवकरच पुतळे उभारण्याचे आश्वासन यावेळी इथापे यांनी दिले.