निजामाबाद: करोना विषाणूच्या वाढत्या विळख्यात विचित्र घटना समोर येत आहेत. करोनाबाधित मृतदेहांना रुग्णालयांतून घेऊन जाण्यासंबंधीच्या धक्कादायक घटना घडत आहेत. असाच प्रकार तेलंगणा राज्यातील निजामाबाद या शहरात घडला आहे. करोनामुळे शिकार झालेल्या एका रुग्णाचा मृतदेह चक्क रिक्षातून नेण्याची वेळ एका कुटुंबावर आली. या घटनेवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
रुग्णाच्या नातेवाईकांनी याबाबत सांगितले की, रुग्णालयाकडे ऍम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याने मृतदेह रिक्षातून आणावा लागला. नियमानुसार करोनामुळे मृत्यू झाल्यास मृतदेह ऍम्ब्युलन्समध्ये किंवा एस्कॉर्ट वाहनातून आणले जाते. तसेच ऍम्ब्युलन्समध्ये ड्रायव्हर आणि इतरांना पीपीई कीट घालणे बंधनकारक आहे.
मात्र या रुग्णालयातील भोंगळ कारभाराचा फटका एका कुटुंबाला बसला. रिक्षातून मृतदेह नेताना नातेवाईक आणि रिक्षा ड्रायव्हर यांनी पीपीई कीट घातले नव्हते. या रुग्णालयावर कारवाईची मागणी होत आहे. मुंबईतही एका मुलाला करोनाबाधित आईचा मृतदेह प्रवासी बॅगेतून न्यावा लागला होता. अशा रुग्णालयांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.