“सूर तेचि छेडिता…’ करोनाग्रस्त वृद्धाने उपचारांवेळी बासरी वाजवून मिळवले जगण्याचे धैर्य!

पुणे (संतोष कचरे/आंबेगाव बुद्रुक) – करोनाचे भय बाळगण्यापेक्षा हिमतीने त्याचा सामना केला, तर अतिदक्षता विभागात उपचार घेणारा व्यक्तीही करोनावर मात करू शकतो, हे यापूर्वी अनेकदा समोर आले आहे. असेच आणखी एक उदाहरण शहरात समोर आले आहे. आंबेगाव बुद्रुक परिसरातील पोपट नामदेव कुंभार यांनी अतिदक्षता विभागात उपचार घेताना स्वत:ला सकारात्मक उर्जा मिळावी, जगण्याचे धैर्य मिळावे, यासाठी बासरीवर सूर छेडले…आता त्यांची प्रकृती ठणठणीत असून, त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

अतिदक्षता विभागात पोपट कुंभार (वय 70) यांच्यावर एकीकडे करोनाचे उपचार सुरू होते. परंतु त्यांनी याही स्थितीमध्ये बासरीवर सूर छेडले…यामुळे रुग्णालयातील निराशाजनक वातावरणातही चैतन्य संचारले.

मारुती कुंभार यांचे वडील पोपट कुंभार यांची कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यातच त्यांना न्यूमोनिया असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु काही दिवस त्यांची प्रकृती आणखी खालावत होती. चिंताग्रस्त झालेल्या कुंभार यांनी नगरसेविका स्मिता कोंढरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते सुधीर कोंढरे यांना मदतीची विनंती केली. 

कोंढरे यांनी धायरी येथील खासगी रुग्णालयात संपर्क साधून बेड उपलब्ध करून देण्याची विनंती केली. बेड उपलब्ध होताच मारुती कुंभार यांच्या वडिलांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

दरम्यान, अतिदक्षता विभाग म्हटले की, फक्त मॉनिटरचे आवाज, प्राणवायू रुग्णांची चाललेली धडपड, डॉक्टरांची रुग्णांना वाचवण्यासाठी चाललेली प्रयत्नांची पराकाष्ठा हेच चित्र डोळ्यांपुढे येते. पण, या रुग्णालयात अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असलेल्या पोपट कुंभार यांनी उपचारांतून वेळ मिळताच बासरीवर सूर छेडले आणि त्यातून उमटलेल्या गीतातून जगण्याची उर्मी मिळवली…

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.