राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३,६४८ वर

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने आता साडेतीन हजारीचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईतील १८४ आणि पुणे शहरातील ७८ रुग्णांसह राज्यात आज नवे ३२८ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत राज्यात ३ हजार ६४८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात असून राज्यातील कोरोनाबाधितांमध्ये मुंबई-पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. एकट्या मुंबईमध्ये आतापर्यंत २ हजार २६९ रुग्ण आढळले आहेत.

राज्यातील कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून कोरोनाबाधितांसाठी पूर्वीपेक्षा अधिक खाटा (बेड) उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती दिली आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुणे, बारामती, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, अकोला, गोंदिया, चंद्रपूर, धुळे, लातूर, नांदेड, मिरज, औरंगाबाद, जळगाव आणि अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात एकूण ३७२५ खाटा कोरोनाबाधीतांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

यापूर्वीच्या ३० रुग्णालयातील २ हजार ३०५ खाटा आणि नव्याने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ४ हजार ३५५ खाटा अशा राज्यात एकूण ६ हजार ६६० खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.