नवी दिल्ली -जगभरातील करोनाबाधितांच्या संख्येने 2 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे त्या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण जगाचे डोळे आता प्रभावी लसीकडे लागले आहेत.
जगातील 213 देश आणि प्रदेशांना करोना संकटाने ग्रासले आहे. त्या संकटावर मात करण्यासाठी संपूर्ण जग झुंजत आहे. अशातच बाधितांच्या संख्येने आणखी एक नकोसा टप्पा ओलांडला आहे.
जगभरात आतापर्यंत करोना संसर्गाने सुमारे 7 लाख 35 हजार बाधितांचा बळी घेतला आहे. करोना संकटाचा सर्वांधिक फटका अमेरिकेला बसला आहे. त्या देशात सर्वांधिक 52 लाखांहून अधिक बाधित आहेत. अमेरिकेत 1 लाख 65 हजार बाधित दगावले आहेत. त्या देशापाठोपाठ बाधित आणि बळींच्या संख्येच्या जागतिक क्रमवारीत ब्राझील दुसऱ्या स्थानी आहे. त्या देशात 30 लाखांहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे. त्यातील 1 लाखहून अधिक बाधित मृत्युमुखी पडले आहेत. बाधित संख्येत भारत तिसऱ्या स्थानी आहे. भारतात 22 लाखांहून अधिक नागरिकांना करोनाबाधा झाली आहे. मृतांच्या संख्येत मेक्सिको आणि ब्रिटन जागतिक क्रमवारीत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत.
मेक्सिकोत 52 हजार, तर ब्रिटनमध्ये 46 हजारांहून अधिक बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल भारतातील मृतांची संख्या 45 हजारांच्या घरात आहे. दरम्यान, जवळपास 1 कोटी 30 लाख बाधित करोनामुक्त होण्याची बाब जगासाठी दिलासादायी ठरली आहे.