करोना पॉझिटिव्हिटी रेट दुपटीने वाढला

फेब्रुवारीत 12 टक्‍के असलेला संसर्ग दर एप्रिल महिन्यात 30 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचला

पिंपरी – करोना रुग्णांच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये (बाधित होण्याचे प्रमाण) गेल्या दोन महिन्यात 17.85 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात हा पॉझिटिव्हिटी रेट 12.23 टक्के इतका अत्यल्प होता. तर, एप्रिल महिन्यात हा दर 30.08 टक्‍क्‍यांपर्यंत जाऊन पोहचला आहे.

शहरामध्ये सध्या दररोज सरासरी दोन हजारांपेक्षा अधिक करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. शहरामध्ये फेब्रुवारी महिन्यात दररोज आढळणाऱ्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्‍यात आली होती. 1 फेब्रुवारीला 69 करोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर, 28 फेब्रुवारीला एकाच दिवसात 423 करोनाबाधित रुग्ण आढळले. म्हणजे दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत तब्बल सहा पटीने वाढ झाली. फेब्रुवारी महिन्यात 43 हजार 437 करोना संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 5 हजार 313 रुग्ण करोनाबाधित आढळले. करोनाबाधितांचा महिनाभरातील पॉझिटिव्हिटी रेट हा 12.23 टक्के इतका अत्यल्प होता.

शहरात 1 मार्चला 253 करोनाबाधित रुग्ण होते. तर, 31 मार्चला 2258 करोनाबाधित रुग्ण आढळले. म्हणजे दररोज आढळणाऱ्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत जवळपास नऊ पटीने वाढ झाली. महिनाभरात 1 लाख 28 हजार 422 करोना संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या.

त्यापैकी 34 हजार 181 करोनाबाधित रुग्ण आढळले. म्हणजे करोनाबाधितांचा महिनाभरातील पॉझिटिव्हिटी रेट हा 26.61 टक्के इतका झाला. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमधील पॉझिटिव्हिटी रेट हा 14.38 टक्‍क्‍यांनी वाढला.

13 दिवसांमध्ये एक लाखाहून अधिक चाचण्या
एप्रिल महिन्यात 1 तारखेला एका दिवसात 2 हजार 113 करोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर, 13 तारखेला एका दिवसात 1 हजार 838 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एप्रिल महिन्यात दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांचे प्रमाण दीड ते अडीच हजारांच्या दरम्यान राहिले आहे. 1 ते 13 एप्रिल अशा 13 दिवसांमध्ये 1 लाख 9 हजार 457 करोना संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 4 हजार 213 रुग्णांचे चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. म्हणजे चाचणी अहवाल प्राप्त 1 लाख 5 हजार 244 रुग्णांपैकी 31 हजार 664 रुग्ण करोनाबाधित आढळले. त्यानुसार रुग्णांचा 13 दिवसांतील पॉझिटिव्हिटी रेट हा 30.08 टक्‍क्‍यांपर्यंत जाऊन पोहचला आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत एप्रिलमधील पॉझिटिव्हिटी रेट हा 17.85 टक्‍क्‍यांनी वाढला आहे.

रिकव्हरी रेट घसरला
शहरामध्ये 1 फेब्रुवारीला एकूण 1 लाख 391 करोनाबाधित रुग्ण होते. त्यापैकी 96 हजार 619 रुग्ण बरे झाले. टक्केवारीत हे प्रमाण 96.24 टक्के इतके होते. 13 एप्रिल रोजी एकूण 1 लाख 71 हजार 802 इतके करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी 1 लाख 45 हजार 276 रुग्ण बरे झाले आहेत. टक्केवारीत हे प्रमाण 84.56 टक्के इतके आहे. म्हणजे फेब्रुवारीच्या तुलनेत एप्रिलमध्ये बरे होण्याचे प्रमाण 11.68 टक्‍क्‍यांनी घसरले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.